स्त्रियांवरील अत्याचार, तसेच समाजाची ढासळलेली नैतिकता यांची कारणे आणि उपाय !

 

गोव्यात अलीकडेच १३ ते १८ वर्षांच्या मुली, ज्या मुलाला कधी प्रत्यक्षात पाहिलेही नाही, अशा ‘ऑनलाईन प्रियकराला’ भेटण्यासाठी पळून गेल्या. भारतात असे प्रकार अन्यत्रही घडत आहेत. समाजाची नैतिकता खालावल्याच्या या काही प्रातिनिधिक घटना आहेत. स्त्रियांवरील अत्याचार, तसेच समाजाची एकूणच ढासळलेली नैतिकता हा सामाजिक माध्यमांच्या अतिरेकाचा दुष्परिणाम म्हणायचा कि तरुण मुला-मुलींना हातात दिलेल्या भ्रमणभाषचा ? हा विभक्त कुटुंबपद्धतीचा परिणाम म्हणायचा कि आधुनिक पालकांना मुलांवर संस्कार करण्यात असलेल्या मर्यादांचा ? वरवर पहाता या घटना म्हणजे ‘प्रेमप्रकरणे’ वाटली, तरी त्या तितक्याशा साध्या नाहीत. त्यांना सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक असे अनेक पदर आहेत. दुर्दैव असे की, या समस्यांवर उपाययोजना काढण्याच्या नावाखाली हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदूंची कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था आणि प्रथा परंपरा यांवर पुरोगाम्यांकडून आघात केले जातात; मात्र या समस्या सोडवण्यासाठी हिंदु जीवनपद्धत अवलंबणेच क्रमप्राप्त आहे.

धर्माचरणातून येणारी नैतिकता स्त्रीमुक्तीवाद्यांना बंधन वाटते !

सौ. रूपाली वर्तक

विदेशात वर्ष १८७० च्या सुमारास चालू झालेली स्त्री-मुक्ती चळवळ भारतात १९८० नंतर बराच जोर धरू लागली. यामध्ये ‘विदेशी स्त्रियांचे प्रश्‍न आपलेही प्रश्‍न आहेत’, असे आधुनिक भारतीय स्त्रियांना वाटले. यात त्यांचा स्वसंस्कृतीचा अभ्यास आणि आचरण अल्प पडले. यामध्ये पुरुषांशी बरोबरी करण्याच्या नादात पाश्‍चात्त्य किंवा आधुनिक नवरूढी (फॅशन) प्रमाणे पोशाख करणे, उशिरापर्यंत घराबाहेर रहाणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले. सध्या तरुण मुली करत असलेली व्यसने, लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध, विवाहबाह्य संबंध किंवा ‘लिव्ह इन’मध्ये रहाणे आदी स्वैराचार हा वैचारिकदृष्ट्या आधुनिक स्त्रियांच्या बंधमुक्त जीवन संकल्पनेचा परिपाक आहे. समाजातील वरील गोष्टींचे वाढलेले मोठे प्रमाण पाहिल्यास लक्षात येते की, अत्याचारांच्या विरोधात लढणार्‍या स्त्रीमुक्ती आंदोलनाची दिशा भरकटल्यामुळे वर्चस्वाच्या एकांगी विचारातून समाजरचनेवर त्याचा विपरीत परिणाम झाला. विदेशात खरे तर केवळ मताधिकारांसाठी ही चळवळ चालू झाली. भारतात म्हणजेच हिंदु धर्मातील कुटुंबात स्त्रियांचे स्थान महत्त्वाचे असतेच. हिंदु धर्मात ‘बालविवाह, सती, केशवपन अशा प्रथा असल्यामुळे हिंदु धर्मात स्त्रियांवर अन्याय होतो’, असे अपसमज पाश्‍चात्त्यांच्या विचारांच्या आधुनिक बुद्धीवाद्यांनी पसरवले. या प्रथांचे आध्यात्मिक किंवा सामाजिक अर्थ त्यांनी समजून घेतले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर ‘हिंदु धर्मच वाईट, चुकीचा, संकुचित, मूलतत्त्ववादी आहे’, असा भ्रम जाणीवपूर्वक पसरवला गेला. त्यामध्ये भारतातील स्त्रीमुक्तीवाद्यांचा पुढाकार होता.

दुसरीकडे सध्या स्त्रियांवर अत्याचारांचे प्रमाण भयावह वाढले असतांना स्त्रीमुक्तीवाद्यांजवळ त्याला रोखण्यासाठी काहीही उपाय नाही. केवळ ‘कुठल्याही प्रकारची वागण्याची बंधने नकोत, तर बघणार्‍या पुरुषांची दृष्टी वाईट आहे’, हे एकच पालूपद त्यांनी चालू ठेवले आहेे; परंतु हा विचार स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यास काहीच उपयोगाचा नाही, हे सिद्ध झाले आहे. प्रत्यक्षात स्त्रियांजवळील बंधनांची नैतिक आत्मशक्ती तिच्यावरील अत्याचारांना मोठ्या प्रमाणात रोखू शकते. एक नीतीमान स्त्री तिच्या मुलांना नैतिकतेचे म्हणजे अन्य स्त्रियांकडे आदराने पहाण्याचे धडे देऊ शकते. ही नैतिकता ज्या धर्माचरणातून येते, तेच आधुनिक स्त्रियांना बंधन वाटते. ते त्यांना नको आहे. त्यामुळे त्यांच्या स्त्रीमुक्तीच्या संकल्पना या अगदीच उथळ आणि बेगडी होऊन जातात. त्यामुळे सध्या तरी भारतात स्त्री मुक्ती आंदोलन हिंदूंच्या प्रथा आणि परंपरा, धर्मग्रंथ यांवर आघात करणे एवढ्या पुरते मर्यादित आणि संकुचित झाले आहे.

नैतिकतेचे शिक्षण देण्याची व्यवस्था सध्याच्या शिक्षणात नाही !

शाळांमधून ‘आदर्श जीवन कसे जगावे ?’, ‘मानवी जीवनाचा उद्देश काय ?’ आदी शिक्षण दिले जात नाही. केवळ जुजबी व्यावहारिक शिक्षण दिले जाते. त्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात परस्परांशी वागण्यात पाळायची कर्तव्ये, नियम यांचा योग्य तो संस्कार मुलांवर या सध्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून होत नाही. तसेच युवावस्थेत वैचारिक प्रगल्भता नसल्यानेे (सध्या बोकाळलेला) ‘चंगळवाद हेच जीवन’ असे मुलांंना वाटत असते. चित्रपट, अभिनेते, समाजमाध्यमे आदी गोष्टी युवकांच्या धर्माचे संस्कार न झालेल्या मनावर अधिराज्य गाजवतात. तेच त्यांना आदर्श वाटते.

विभक्त कुटुंबात नैतिकतेचे संस्कार होण्यास मर्यादा येतात !

सध्याच्या बहुसंख्य चौकोनी कुटुंबात पालकच चंगळवादी झालेले आहेत. मुलांवर संस्कार करण्यासाठी स्वतः त्यागमय जीवन जगले पाहिजे, हे त्यांच्या गावीही नसते. अर्थप्राप्ती हेच जीवनाचे ध्येय मानणार्‍या पालकांकडून मुलांवरही तसेच संस्कार होतात. पालक स्वतःच दूरचित्रवाणी, चित्रपट, चित्रपटगीते, सामाजिक माध्यमे यांच्या आधीन झालेले असतात. त्यामुळे मुलांवरही धार्मिक संस्कार अभावानेच होतात. झाले तरी त्यामागचे शास्त्र पालकांना ठाऊक नसल्यामुळे मुलांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यास त्यांना मर्यादा येतात. अर्थाजन करणारे शहरातील पालक घराबाहेर राहिल्याने, तसेच दूरचित्रवाणी आणि समाजमाध्यमे यांमुळे ‘मुलांशी मोकळेपणाने संवाद’ ही गोष्टही सध्या हरवून बसली आहे. सध्या समाजात सर्वत्र भडकलेला ‘पॉर्न’चा वणवा कोणीही थांबवू शकलेले नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर हिंदु संस्कृतीतील एकत्र कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित होते. पूर्वी ही कुटुंबपद्धत अबाधित होती, तेव्हा समाजात अनाचार अल्प होता. घरातील वडीलधार्‍या व्यक्तींकडून लहानांना मार्गदर्शन होत असे. आत घरात मुलांना लाडाकोडात वाढवले गेल्यामुळे पालकांचा धाक, आदर आदी गोष्टीही सध्या त्यांच्यात अगदी अभावाने आढतात. घरातल्यांचे ऐकण्याची पद्धत होती, तेव्हा समाजातील अनाचार तुलनेत अल्प होते. आज ही कुटुंबपद्धत मोडकळीस येत असल्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत.

धर्माचरणी व्यक्तींनी बनलेले रामराज्य स्त्रियांना सुरक्षा प्रदान करतेे !

हिंदु धर्म आनंदी जीवनासाठी आवश्यक कर्तव्य आणि त्याग शिकवतो. संयम शिकवतो. नैतिकता शिकवतो. धर्माचरण शिकवतो. या सर्व गोष्टी अर्थ आणि काम हे दोन्ही नियंत्रित ठेवू शकतात. सध्या समाजात वाढलेली सर्व प्रकारची गुन्हेगारी आणि अत्याचार हे धर्माच्या प्रभावानेच अल्प होऊ शकतात. हिंदु धर्मातील कर्मफलन्याय सिद्धांत आणि पाप संकल्पना दुष्कृत्यांपासून व्यक्तीला दूर ठेवते. धर्म हा स्त्री आणि पुरुष यांना त्यांच्या मर्यादा अन् कर्तव्ये सांगतो, तसेच अनैतिक कृत्यांपासून त्यांना सहजपणे परावृत्त करतो. पर्यायाने गुन्हे टळू शकतात. धर्मानुसार आचरण करणारे सुखी आणि आनंदी होतात. धर्माचरण केल्याने ‘अंगभर वस्त्र घालणे’ हे बंधन वाटत नाही. आजही समाजात अनेक जण धर्माचरण करणारेच आहेत. धर्माचरणाने सुरक्षित जीवनाची ग्वाही मिळते. स्त्रियांच्या हातात कुटुंबाला घडवण्याची क्षमता असते. स्त्री धर्माचरणी असली, तर तिच्यामुळे धर्म टिकून रहातो. धर्माचरणाने धर्माभिमान निर्माण होतो. कुटुंबात युवतींमध्ये लहानपणापासूनच धर्माभिमान निर्माण केला, तर पुढे अन्य धर्मियांपासून त्यांची फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात टळतो. धर्माचरणाने युवक-युवतींचे उथळ आणि थिल्लर वागणे टळून त्यांच्यातही अंतर्मुखता वाढते. लव्ह जिहादसारख्या संकटांविषयी धर्माभिमानी हिंदूंनी आवाज उठवला, तर ‘इस्लामफोबिया’ म्हणून त्यांच्यावर टीका होते. पण इस्लाम धर्मीय किती मुलींनी आतापर्यंत हिंदु मुलांशी विवाह केला आहे ? धर्माचरण आणि धर्माभिमान हातात हात घालून चालतात. धर्माचरणी व्यक्तीचा राष्ट्राभिमानही प्रखर असतो. स्त्रियांची सुरक्षा ही रामराज्यात अबाधित असते. असे रामराज्य हे नागरिकांनी धर्माचरण केले, तर अस्तित्वात येते. यावरून एकूणच समाजाच्या सर्वांगीण आरोग्यासाठी धर्माचरणाचे महत्त्व लक्षात येईल. मुसलमान मुलगी पळून गेली आहे, अशी किती उदाहरणे तुम्ही ऐकली आहेत ? धर्माचरणाच्या प्रभावाचा हा परिणाम आहे.

पुरोगाम्यांची धाव ‘हिंदु धर्मा’पर्यंत !

मागील काही वर्षे पुरोगामी, निधर्मी, साम्यवादी आदींनी हिंदूंचे धार्मिक विधी, व्रते, सण, उत्सव आदींविषयी अत्यंत द्वेषपूर्ण आणि चुकीचे विचार हिंदूंच्या मनात भरवण्याचा प्रयत्न विविध माध्यमांतून केला; परंतु आता परत काळ पालटत आहे. हिंदु योग, आयुर्वेद यांकडे वळत आहेत. कोरोनाच्या आक्रमणानंतर तर यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या पुरोगाम्यांच्या विचारांचा फार काही विचार लोक करतात, असे नाही. हिंदु कुटुंबव्यवस्था लोक मानायला लागले आहेत. आजही वटपौर्णिमा, व्रते हिंदु महिला आनंदाने करतांना दिसतात. पुरोगामी केवळ हिंदूंच्या धर्माचरणाला नावे ठेवतात. अन्य पंथियांच्या ठेवण्याचे धारिष्ट्य करत नाहीत. अन्य पंथियांच्या धर्माविषयी काही बोलले, तर त्यांची काय स्थिती होईल, त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते त्यांच्या वाटेला जात नाहीत. त्यांची धाव केवळ ‘हिंदु धर्मा’पर्यंतच आहे !

लक्षावधी वर्षे हिंदु संस्कृती टिकली ती हिंदूंच्या धर्माचरणामुळेच. इंग्रजांच्या आक्रमणानंतर गुरुकुलपद्धत लोप पावली, स्वातंत्र्यानंतरही हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले नाही; त्याचा परिणाम म्हणजे सध्या समाजातील नैतिकता ढासळली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणावरील निष्ठा आणि कृती यांची आवश्यकता आहे. येत्या काळात जे हिंदु धर्माच्या बाजूने राहून ईशभक्ती करतील, ते येणार्‍या आपत्काळातील सर्व प्रकारच्या अराजकांतून तरून जातील.

– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.