B’desh Sharia Law Demand : बांगलादेशात शरीरयत कायदा लागू करण्यासाठी इस्लामी कट्टरपंथी एकत्र !

ढाका – माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशात सत्ताच्युत करण्यास साहाय्य करण्यास हातभार लावणार्‍या इस्लामी कट्टरतावादी संघटना देशात शरीयत कायदा लागू करण्यासाठी सक्रीय झाल्या आहेत. त्या बांगलादेशाला इस्लामी कट्टरतावादाच्या दिशेकडे ढकलण्यात गुंतल्या आहेत. कट्टरतावादी इस्लामी नेते बांगलादेशात इस्लामी सरकार स्थापन करण्याच्या दिशेने कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

एका शहरात इस्लामी कट्टरतावाद्यांनी घोषणा केली की, तरुणी फुटबॉल खेळू शकणार नाहीत. दुसर्‍या एका शहरात सार्वजनिक ठिकाणी एका महिलेने डोके न झाकल्यामुळे तिचा छळ करण्यात आला.

बांगलादेशात कट्टरतावाद वाढत असल्याची ‘न्यूयॉर्क टाइम्स’ची माहिती

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने वृत्त प्रसारित केले असून बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून तेथे कट्टरतावाद्यांना मोकळे रान मिळाले आहे, असे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. ‘जो इस्लाम मानणार नाही किंवा इस्लामी विचारसरणीच्या विरोधात जो कुणी कृती करील, त्याला शिक्षा देण्यात येईल’, अशा विचारसरणीच्या लोकांना देश कह्यात घ्यायचा आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. बांगलादेशाची नव्याने राज्यघटना लिहिण्यात येत आहे. राज्यघटनेमध्ये ‘निधर्मीवाद’ हा शब्द वगळण्यात येणार असून देश इस्लामी तत्त्वांनुसार चालवण्यावर भर देण्यात येणार आहे. शेख हसीना सत्ताच्युत झाल्यानंतर बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचा अपलाभ तेथील कट्टरतवादी संघटना उठवण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही या लेखात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात आधीच कट्टरतावाद फोफावला आहे. त्यामुळे तेथील हिंदू नरकयातना भोगत आहेत. तेथे कट्टरतावाद्यांच्या हातात सत्ता गेल्यास तेथील हिंदू नामशेष होतीलच; मात्र त्यासह भारताच्या सुरक्षेसाठीही ते धोकादायक असेल. त्यामुळे भारत सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक !