Siddhivinayak Mandir Trust Mumbai : नवजात बालिकांच्या नावे १० सहस्र रुपये; मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव योजना !

मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय !

श्री सिद्धिविनायक

मुंबई – येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ राबवण्यात येत असून त्याला ‘न्यास’ या व्यवस्थापन समितीने मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मास आलेल्या बालिकांच्या नावाने १० सहस्र रुपयांचे ठेव स्वरूपात त्यांच्या आईच्या बँक खात्यावर ठेवण्याविषयीची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. शासनाच्या मान्यतेनंतर योजनेसाठीचे निकष घोषित करण्यात येतील, अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आली आहे.

१. राज्यातील मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य करणे, मुलींना सक्षम बनवण्यास प्रयत्न करणे. या उद्देशांना हातभार लागावा. यासाठी श्री सिद्धिविनायक गणपति मंदिराच्या वतीने नवीन उपक्रम चालू करण्यात आला आहे.

२. श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक ३१ मार्च या दिवशी संस्थेचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

३. श्रीसिद्धिविनायक गणपति मंदिर न्यासाचा वर्ष २०२४-२५ चे वार्षिक विवरणपत्र, तसेच वर्ष २०२५-२५चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक या बैठकीत सादर करण्यात आले. वर्ष २०२४-२५ या वर्षात न्यासाचे उत्पन्न ११४ कोटी रुपये इतके अपेक्षित होते. ते विक्रमी १३३ कोटी रुपयांच्या घरात गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १५ टक्के वाढ आहे.

४. आता पुढील उत्पन्न १५४ कोटी रुपये इतके गृहित धरण्यात आले आहे. संस्थेच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिनाच्या दिवशी ८ मार्च या दिवशी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ राबवण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेवर सादर करण्याविषयीची घोषणा अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! सरकारीकरणामुळे भक्त आणि मंदिर यांच्या विकासासाठी भक्तांचा पैसा न वापरता तो शासनाने राबवणे आवश्यक असलेल्या योजनांसाठी व्यय केला जातो, हे चिंताजनक आहे !
  • अशा प्रकारच्या योजनांचा अपलाभ अल्पसंख्यांकांकडून त्यांच्या मुलींसाठीही घेतला जाऊ शकतो. यासाठी भक्तांनी अशा योजनेला कडाडून विरोध करावा आणि योजना बंद करण्यास अन् मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात लढण्यास सिद्ध व्हावे !