तैमूर बलात्कारी होता, तर औरंगजेब अतिशय वाईट माणूस होता !  

  • पाकिस्तानी लेखक सलमान रशीद यांनी मुसलमानांच्या डोळ्यांत घातले झणझणीत अंजन

  • मोगल, खिलजी, तैमूर, गझनी यांना आदर्श मानणार्‍या पाकिस्तानी लोकांवर केली टीका !

सलमान रशीद (सौजन्य: नवभारत टाइम्स)

इस्लामाबाद – भारतातील अनेक भागांमध्ये विशेषतः महाराष्ट्रात अलीकडेच मोगल सम्राट औरंगजेबावरून वाद निर्माण झाला आहे. भारतात ‘छावा’ या चित्रपटामध्ये औरंगजेबाची कुकृत्ये दाखवल्यानंतर भारतात त्याची कबर खोदण्याची मागणी केली जात आहे. भारतात चालू असलेल्या या चर्चेवर पाकिस्तानमध्येही प्रतिक्रिया उमटली आहे. या विषयावर लेखक सलमान रशीद यांनी भाष्य केले आहे. पत्रकार आरजू काझमी यांच्याशी बोलतांना सलमान रशीद म्हणाले की, मोगल, खिलजी, तैमूर, गझनी हे सर्व भारतीय नव्हते. हे लोक अफगाणिस्तान, इराण आणि अरबस्तान येथून आले होते. या लोकांचे लक्ष भारताच्या संपत्तीवर होते. भारताला लुटण्यापेक्षा त्यांचा दुसरा कोणताही हेतू नव्हता. या आक्रमकांना आदर्श मानणार्‍या पाकिस्तानी लोकांवरही त्यांनी टीका केली. सलमान रशीद म्हणाले, ‘‘आपले नायक आपल्याच भूमीतील लोक असले पाहिजेत.’’ तैमूरविषयी बोलतांना सलमान रशीद म्हणाले की, तो बलात्कारी होता. त्याने अनेक लोकांना ठार मारले. तैमूरचा मुलगाही महिलांवर अत्याचार करायचा. ते अतिशय क्रूर लोक होते.

सलमान रशीद यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. मोगलांनी किती मंदिरे पाडली, याची अचूक माहिती उपलब्ध नाही. ताजमहालही मंदिर असल्याचा दावा केला जातो. औरंगजेबाच्या काळात जझिया कर लादण्यासारख्या गोष्टी घडल्या.

२. ८० च्या दशकात पाकिस्तानात हुकूमशहा राष्ट्रपती झिया उल हक यांनी जे केले, तेच काम त्यावेळी औरंगजेबाने केले होते. औरंगजेबाने समाजात फूट पाडण्याचे केलेले काम खूप वाईट होते. औरंगजेबात कौतुकास्पद असे काहीही नव्हते.

३. मुसलमानांनी औरंगजेबाने आपला नायक मानू नये. पंजाब आणि सिंध यांच्या भूमीसाठी लढणार्‍या लोकांना आपण विसरलो आहोत.