
पणजी, १ एप्रिल (वार्ता.) – मध्यवर्ती गटार यंत्रणेमुळे पणजी येथील १८ जून रस्ता, आत्माराम बोरकर रस्ता आणि पिसुर्लेकर रस्ता यांचे काम ‘स्मार्ट सिटी’च्या अंतर्गत करता येणार नाही. सरकारला याविषयी कळवण्यात आले आहे. ‘स्मार्ट सिटी’ची ९० टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. रस्त्याची कामे नियोजित समयमर्यादा म्हणजेच ३१ मार्चपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे, अशी माहिती ‘इमेजीन पणजी स्मार्ट सीटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी दिली. ‘स्मार्ट सिटी’च्या अंतर्गत चालू असलेली कामे आणि कामांसाठी असलेली समयमर्यादा यांविषयी माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली.
याचिकेच्या अंतर्गत ‘स्मार्ट सिटी’च्या वतीने २७ जानेवारी या दिवशी न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या समयमर्यादेचे ‘स्मार्ट सिटी’कडून पालन झालेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज पुढे म्हणाले, ‘‘सांत इनेज आणि कॅफे भोसले चौकातील रस्त्यांची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात आली. रंगकाम, दिशादर्शक फलक, झाडे लावणे आणि परिसराचे सौंदर्यीकरण आदी कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणार आहेत.’’
ताडमाड येथील वडाचे झाड आणि घुमटी सुरक्षित
मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज पुढे म्हणाले, ‘‘ताडमाड येथील वडाचे झाड आणि घुमटी सुरक्षित आहे. हा रस्ता २०० मीटर लांब असून त्यापैकी १२० मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रायबंदर येथील फेरीबोटीच्या धक्क्याचे काम ठरल्याप्रमाणे पूर्ण झाले आहे. ‘१८ जून’, आत्माराम बोरकर आणि पिसुर्लेकर रस्ता यांची कामे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येणार आहेत. खाते यासंबंधी स्वतंत्र निविदा काढणार आहे.