बलुचिस्तानच्या नागरिकांना पाकिस्तानपासून स्वतंत्र का व्हायचे आहे ?

वर्ष १५४० मध्ये भारताचा पहिला मोगल शासक बाबरचा मुलगा हुमायून याला बिहारच्या शेरशाह सूरीने युद्धात पराभूत केले. हुमायून भारतातून पळून गेला. त्याने पर्शिया, म्हणजेच इराणमध्ये आश्रय घेतला. शेरशाह सुरीचा मृत्यू वर्ष १५४५ मध्ये झाला. संधी ओळखून हुमायूनने भारतात परतण्याची योजना आखण्यास प्रारंभ केला. मग बलुचिस्तानच्या आदिवासी सरदारांनी त्याला या योजनेत साहाय्य केले. वर्ष १५५५ मध्ये बलुचिस्तानच्या नागरिकांच्या पाठिंब्याने हुमायूनने देहलीवर पुन्हा ताबा मिळवला. वर्ष १६५९ मध्ये मोगल सम्राट औरंगजेब देहलीचा शासक बनला. त्याची सत्ता पश्चिमेला इराणी सीमेपर्यंत पसरली होती; परंतु दक्षिणेत त्याला सतत मराठ्यांकडून आव्हानांना तोंड द्यावे लागत असे. त्यानंतर बलुची सरदारांनी मोगल राजवटीविरुद्ध बंड केले आणि बलुची नेता मीर अहमद याने वर्ष १६६६ मध्ये औरंगजेबाकडून बलुचिस्तानचे २ भाग कलात आणि क्वेट्टा जिंकले. बलुच कोण आहेत ?, जे त्यांच्या गनिमी काव्याच्या कौशल्यासाठी आणि लढाऊ स्वभावासाठी ओळखले जातात अन् ते पाकिस्तानविरुद्ध का लढत आहेत ?, याविषयीची सविस्तर माहिती येथे दिली आहे.

१. बलुचिस्तानचा इतिहास अनुमाने ९ सहस्र वर्षांचा

आज बलुचिस्तान ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणाचा इतिहास अनुमाने ९ सहस्र वर्षे जुना आहे. त्या वेळी येथे मेहरगड होते. हे सिंधु संस्कृतीतील एक प्रमुख शहर होते. अनुमाने ३ सहस्र वर्षांपूर्वी जेव्हा सिंधु संस्कृती संपली, तेव्हा येथील लोक सिंध आणि पंजाब या भागांमध्ये स्थायिक झाले. यानंतर हे शहर वैदिक संस्कृतीच्या प्रभावाखाली आले. येथे हिंदूंच्या मुख्य शक्तिपीठांपैकी एक आहे – हिंगलाज माता मंदिर, जे पाकिस्तानमध्ये ‘नानी का हज’ म्हणूनही ओळखले जाते. कालांतराने हे शहर बौद्ध धर्माचे एक प्रमुख केंद्र बनले. ७ व्या शतकात जेव्हा अरब आक्रमकांनी या भागावर आक्रमण केले, तेव्हा येथे इस्लामचा प्रभाव वाढला.

२. बलुच पाकिस्तानात कसे आले ?

बलुच पाकिस्तानात कसे आले ? आणि स्थायिक कसे झाले ? याविषयी २ सिद्धांत आहेत.

अ. लोककथेनुसार पहिला सिद्धांत : बलुचिस्तानच्या कलात राज्याचे शेवटचे शासक मीर अहमद यार खान यांनी त्यांच्या ‘इनसाईड बलुचिस्तान’ या पुस्तकात लिहिले आहे, ‘बलुच लोक स्वतःला पैगंबर इब्राहिम यांचे वंशज मानतात. ते सीरियाच्या परिसरात रहात होते. पाऊस नसल्याने आणि दुष्काळामुळे हे लोक स्थलांतर करू लागले. सीरिया सोडल्यानंतर या लोकांनी इराणच्या हद्दीत तळ ठोकला. तत्कालीन इराणी राजा नुशिरवानला हे आवडले नाही आणि त्याने या लोकांना येथून हाकलून लावले. यानंतर हे लोक त्या भागात पोचले, ज्याला नंतर ‘बलुचिस्तान’ असे नाव देण्यात आले.

जेव्हा बलुचांनी इराण सोडले, तेव्हा त्यांचा नेता मीर इब्राहिम होता. तो जेव्हा बलुचिस्तानला पोचला, तेव्हा त्याची जागा मीर कमर अली खान यांनी घेतली. प्रेषित इब्राहिम यांच्या नावावरून या वंशाला ‘ब्राहिमी’ असे नाव पडले, जे नंतर ब्रावी किंवा ब्रोही झाले. या भागात बलुच लोक स्थायिक झाले. शेकडो वर्षांनंतर जेव्हा मोगलांनी भारतावर राज्य केले, तेव्हा ते बलुच लोकांचे मित्र बनले. या काळात बलुचिस्तानच्या कलात भागात सेवा राजवंशाचे राज्य होते, जे हिंदु राजवंश मानले जाते. या राजवंशातील एक प्रसिद्ध शासक राणी सेवी होती, ज्यांच्या नावावरून नंतर सिबी प्रदेशाचे नाव देण्यात आले. सेवा राजवंशाने प्रामुख्याने कलात आणि त्याच्या आसपासच्या भागात राज्य केले अन् त्या काळात ते हिंदु परंपरांचे पालन करत होते. १५७० च्या दशकात भारताचा मोगल सम्राट अकबर याने बलुचांच्या साहाय्याने कलातवर आक्रमण केले आणि सेवा राजवंशाकडून त्याचे नियंत्रण हिसकावून घेतले.

१७ व्या शतकाच्या मध्यात मोगलांचे वर्चस्व कमकुवत होऊ लागले आणि बलुच जमातींनी बंड करायला प्रारंभ केला. १८ व्या शतकापर्यंत मोगलांनी येथे राज्य केले; परंतु बलुचांनी त्यांना हाकलून लावले. येथून बलुचांनी कलातमध्ये त्यांच्या राज्याचा पाया घातला आणि बलुचिस्तानात बलुचांचे राज्य चालू झाले.’

आ. इतिहासकारांनुसार दुसरा सिद्धांत : इतिहासकारांचे म्हणणे आहे की, बलुच लोक सीरियातील अरबांपेक्षा इंडो-इराणी लोकांच्या जवळचे आहेत. इंडो-इराणी लोकांना ‘आर्य’ असेही म्हणतात. या संदर्भात इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, बलुच नागरिकही आर्य आहेत. सहस्रो वर्षांपूर्वी आर्य मध्य आशियात रहात होते; परंतु खराब हवामान आणि युद्ध परिस्थितीमुळे ते दुसर्‍या ठिकाणच्या शोधात ते ठिकाण सोडून गेले. तिथून निघून ते प्रथम आर्मेनिया आणि अझरबैजान येथे पोचले. ते अझरबैजानच्या ब्लासगन प्रदेशात राहू लागले. येथे आर्यांची भाषा आणि बोली यांचे मिश्रण करून एक नवीन भाषा निर्माण झाली, ज्याला ‘बालाशक’ किंवा ‘बालाशोकी’ असे नाव देण्यात आले. आर्य लोकांना ‘बालाश’ म्हटले जाऊ लागले.

इ.स. पूर्व ५५० मध्ये अझरबैजान इराणच्या खाम साम्राज्याच्या कह्यात आले. सस्सानिद साम्राज्याची स्थापना २२४-६५१ मध्ये झाली. ६ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि ७ व्या शतकाच्या प्रारंभीला या प्रदेशावरील बाह्य आक्रमणे वाढली अन् हवामानही खराब झाले. म्हणून मध्य आशियातून येथे आलेले आर्य वेगवेगळ्या भागांत स्थायिक झाले.

काही लोक इराणच्या जानुबी (दक्षिण) बाजूला, तर काही इराणच्या मगरिब (पश्चिम) बाजूला गेले. आर्य जानुबीकडे गेले आणि तिथून पुढे इराणमधील कामन अन् सिस्तान येथे पोचले. येथे त्यांचे नाव ‘बालाश’वरून ‘बलुच’ करण्यात आले आणि बोलीचे नाव ‘बालाशोकी’वरून ‘बलुची’ करण्यात आले. हळूहळू बलुच लोक सिस्तानच्या पलीकडे असलेल्या भागात शिरले. पुढे या भागाला ‘बलुचिस्तान’ असे नाव पडले.

३. बलुचिस्तान : पाकिस्तानचे सर्वांत मोठे राज्य

बलुचिस्तान हे पाकिस्तानचे सर्वांत मोठे राज्य आहे, जे त्याच्या ४४ टक्के भूभागावर व्यापलेले आहे. जर्मनीएवढा आकार असूनही त्याची लोकसंख्या केवळ १.५ कोटी आहे की, जी जर्मनीपेक्षा ७ कोटीपेक्षा न्यून आहे. बलुचिस्तानमध्ये तेल, सोने, तांबे आणि इतर खाणी समृद्ध आहेत. या संसाधनांचा वापर करून पाकिस्तान त्याच्या गरजा पूर्ण करतो. असे असूनही हे क्षेत्र सर्वांत मागासलेले आहे. यामुळेच बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध द्वेष वाढत आहे. पाकिस्तानने बलुचिस्तानवर ताबा मिळवल्यापासून येथे ५ मोठी बंड झाली आहेत. सर्वांत अलीकडील बंडखोरी वर्ष २००५ मध्ये चालू झाली आणि ती आजही चालू आहे.

४. आधुनिक बलुचिस्तानचा इतिहास १५० वर्षांचा

आधुनिक बलुचिस्तानची कहाणी वर्ष १८७६ मध्ये चालू होते. त्या वेळी बलुचिस्तानवर कलात संस्थानाचे राज्य होते. भारतीय उपखंड ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. त्याच वर्षी ब्रिटीश सरकार आणि कलात यांच्यात एक करार झाला. या करारानुसार ब्रिटिशांनी कलात यांना सिक्कीम आणि भूतान यांच्याप्रमाणे ‘संरक्षित राज्या’चा दर्जा दिला, म्हणजेच भूतान अन् सिक्कीम यांच्याप्रमाणे ब्रिटीश सरकारचा कलातच्या अंतर्गत गोष्टींमध्ये कोणताही हस्तक्षेप नव्हता; परंतु परराष्ट्र आणि संरक्षण यांमध्ये त्यांचे नियंत्रण होते.

५. भारताप्रमाणेच कलातमध्येही स्वातंत्र्याची मागणी झाली तीव्र !

भारतीय उपखंडात स्वातंत्र्याची प्रक्रिया वर्ष १९४७ मध्ये चालू झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्याप्रमाणे कलातमध्येही स्वातंत्र्याची मागणी तीव्र झाली. वर्ष १९४६ मध्ये जेव्हा ब्रिटीश भारत सोडून जात असल्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा कलातचे खान, म्हणजेच शासक मीर अहमद खान यांनी महंमद अली जिना यांना ब्रिटिशांसमोर त्यांचा खटला सादर करण्यासाठी ‘सरकारी अधिवक्ता’ म्हणून नियुक्त केले.

४ ऑगस्ट १९४७ या दिवशी देहलीत बलुचिस्तान नावाचा एक नवीन देश निर्माण करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली. मीर अहमद खान यांच्यासह जिना आणि जवाहरलाल नेहरू यांनीही यात भाग घेतला. बैठकीत जिना यांनी कलातच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. बैठकीत ब्रिटीश व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनीही मान्य केले, ‘कलातला भारत किंवा पाकिस्तान यांचा भाग असण्याची आवश्यकता नाही.’ मग जिना यांनी स्वतः सुचवले, ‘कलात, खारान, लास बेला आणि मकरन हे ४ जिल्हे एकत्र करून स्वतंत्र बलुचिस्तान निर्माण करावे.’

(क्रमशः)

या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/898767.html

– संजय झा, इस्लामाबाद, पाकिस्तान.

(साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’चे संकेतस्थळ)