छत्रपती शिवाजी महाराज ‘सेक्युलर’ (निधर्मी) नव्हतेच !

सध्या ‘छत्रपती शिवाजी महाराज ‘सेक्युलर’ (निधर्मी) होते. ते सर्वधर्मसमभाव मानणारे होते. त्यांच्या सैन्यात मुसलमानही होते’, अशा चर्चांना फार उधाण आलेले आहे. तसे म्हणायला गेले, तर हा काही चर्चेचा विषय नाही की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्या धर्माचे पुनरुत्थान केले, हे सर्वांना ठाऊकच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले ‘हिंदवी स्वराज्य’च होते. मुळात ‘हिंदवी’ हा शब्द ‘हिंदु’ या शब्दाशी जोडून घेतलेला आहे.

रामचंद्रपंत अमात्य आज्ञापत्रात म्हणतात, ‘हे आवनी मंडळ निर्यावन करावे. यवनाक्रांत राज्य आक्रमावे, हा निघूड चित्ताभिप्राय प्रकट करून पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या प्रांती जे जे यवन स्तोम बद्धमूल झाले होते, ती मारून काढण्यासाठी आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत…’ यातून हेही स्पष्ट होत की, छत्रपती शिवरायांनी त्यांची तलवार आक्रमणकर्त्यांच्या विरुद्ध सदैव उगारलेली होती.

१. छत्रपती शिवाजी महाराज निधर्मी नसल्याची काही उदाहरणे 

छत्रपती शिवाजी महाराज खरच ‘सेक्युलर’ होते का ? हे काही उदाहरणातून पाहूया.

अ. कवींद्र परमानंद यांनी लिहिलेल्या ग्रंथातील उदाहरण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेला ‘शिवभारत’ हा कवींद्र परमानंद यांचा ग्रंथ त्यातील हे उदाहरण.

‘वर्ष १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कल्याण – भिवंडीला आले आणि तिथे ज्या देवळांच्या मशिदी झालेल्या होत्या, त्या सर्व मशिदी परत भुईसपाट करून तिथे नवीन मंदिरे उभारली. तिथल्या काझी आणि मौलवींना कैद करून ठेवले अन् या मुलाचे हे उपद्व्याप असे वाढत राहिले, तर आपल्या धर्मप्रसाराला अडचण येईल; म्हणून अली आदिलशहाने अफजलखानाची नियुक्ती केली.’ यातील मूळ श्लोक असा आहे, ‘त्वया गृहीत्व कल्याणम् तथा भीमपुरी मपी यवानांना महासिद्धी निलया किलपातीता हाः ।’ अनेक जण शिवचरित्र लिहितांना कवींद्र परमानंद यांचे अनेक संदर्भ वापरतात; पण त्यात ‘मशिदी पाडून त्या ठिकाणी परत हिंदूंची मंदिरे उभी केली’, हे संदर्भ वापरत नाहीत. यामुळे आमच्यापासून इतिहास लपून ठेवला जातो, हेच दुर्दैव आहे.

आ. छत्रपती शिवाजी महाराज व्यंकोजीराजांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘हे सर्व तुर्क फौजे ठेविलियाने जय कैसा मिळतो.’ अशा प्रकारे म्हणणारे छत्रपती शिवराय आपल्या फौजेमध्ये कधी मुसलमान सैनिकांना जागा देतील का ?

कु. पार्थ घनवट

२. खोटी पात्रे बनवून समाजाची दिशाभूल

सध्या काही जण ‘मदारी मेहतर’ हे नाव छत्रपती शिवरायांच्या ‘आगर्‍याहून सुटका’ या प्रकरणात नेहमी घेतात; पण या नावाला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. हे नाव कुठल्या कागदपत्रातही येत नाही, तसेच कुठल्या बखरीतही येत नाही. त्यामुळे अशा प्रकारची खोटी पात्रे बनवून समाजाची दिशाभूल केली जात आहे.

३. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी केलेल्या कार्याचे कवी भूषण यांनी केलेले वर्णन

कवी भूषण त्यांच्या काही छंदातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन करतांना म्हणतात,

‘देवल गिरावते फीरावते निसान अलि ।
ऐसे डुबे राव राणे सभी गये पण लपकी ।।

गौरा गणपती या औरंग को देत ताप ।
आपणही बारि आयो को मारी गयो दबकी ।।

पिरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत ।
सिद्ध की सिधायी गयी रही बात रब की ।।

काशी हुकि कला गई, मथुरा मशीद भई ।
अगर शिवाजी न होत तो सुन्नत होती सबकी ।।’

या छंदात मुसलमानांच्या आक्रमणांनी हिंदूंची आणि त्यांच्या धर्माची उडालेली दैना; देवता, देवालय यांचा झालेला विध्वंस, बळजोरीने यवनी धर्माचा प्रसार करण्याची महत्त्वाकांक्षा आदी हा भाग आपल्याला स्पष्ट दिसून येतो, तसेच जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर एव्हाना सर्वांची सुंता झाली असती, हे कवी भूषण यांनी दाखवून दिलेले आहे.

‘वेदांचे रक्षण छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले’, असे सांगणारे एकमेव कवी भूषण आहेत. ते म्हणतात,

‘वेद राखे विनीत, पुराण प्रसिद्ध राखीओ ।
राम नाम राखिओ अति रसना सुधर में ।।

हिंदूंन कि चोटी रोटी राखी हैं सिपहनकी ।
कंधे मै जनेवू राखीओ माला राखी घर मै ।।

मेडी राखी मुघल मरुडी राखे बादशहा बैरी ।
पीसी राखे वरदान राखीओ कर मै ।।

राजन की हद राखी तेघ बल शिवराय ।
देव राखे देवल स्वधर्म राखीओ घर मे ।।

हे सर्व वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ‘सेक्युलर’ नव्हते, हे आपल्याला लक्षात येते.

४. …याहून मोठे दुर्दैव ते काय ?

या सगळ्यात जे राजकारणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ राजकारणासाठी उपयोग करून घेतात, त्यांना असे कधीच वाटत नाही की, सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर असलेल्या शिवराजेश्वर मंदिरात जाऊन अर्पण करावे किंवा त्या मंदिराचा जिर्णोद्धार करावा; परंतु औरंगजेबाची कबर काढायची म्हटली की, लगेच काही पुरोगाम्यांच्या पोटात दुखायला प्रारंभ होतो. ज्या मोगलांनी आमच्यावर वर्षानुवर्षे अत्याचार केले, त्यांच्या कबरी आपण जपून ठेवतो, यासारखे मोठे दुर्दैव ते कोणते ?

– कु. पार्थ घनवट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.३.२०२५)