US attacks Houthi terrorist : येमेनमध्ये हुती आतंकवाद्यांच्या ठिकाणांवर अमेरिकेचे आक्रमण !

साना (येमेन) – अमेरिकेने येमेनमधील हुती आतंकवाद्यांच्या नियंत्रणाखालील भागात हवाई आक्रमण केले. लाल समुद्रातील बंदर शहर होदेइदाजवळ अमेरिकेचे अत्याधुनिक ‘एमक्यू-९ रिपर’ ड्रोन पाडल्याचा दावा हुती आतंकवाद्यांनी केला आहे. अमेरिका हुती आतंकवाद्यांच्या तळांवर सतत हवाई आक्रमणे करीत आहे. ही परिस्थिती इस्रायल-हमास युद्धामुळे उद्भवली आहे. त्यामुळे हुती आतंकवद्यांना लक्ष्य केले जात आहे. अलीकडच्या काळात किमान ६५ लोक मारले गेल्याचा दावा हुतींनी केला आहे.

इराणवर दबाव आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न !

ट्रम्प प्रशासन इराणच्या विस्तारित अणू कार्यक्रमावरून त्याच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने इराण समर्थित हुती आतंकवाद्यांवर सतत हवाई आक्रमणे चालू केली आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रसारमाध्यम सचिव कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, हुती आतंकवाद्यांवर आतापर्यंत २०० हून अधिक हवाई आक्रमणे करण्यात आली आहेत. लाल समुद्राच्या प्रदेशात जलवाहतुकीचे स्वातंत्र्य मिळेपर्यंत ही आक्रमणे थांबणार नाहीत.