म. ज्योतिराव फुले यांचे तत्कालीन अनुयायी सत्यशोधक समाजाचे भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे यांचे पणतू मल्हारराव डुंबरेगुरुजी यांचे ९१ व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या परिवाराने पारंपरिक पिंडदान, काकस्पर्श, केशवपन, धार्मिक प्रवचन, तसेच इतर धार्मिक कर्मकांड विधी टाळून सत्यशोधक पद्धतीने केवळ शोकसभेचे आयोजन केले. ही घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सत्यशोधकांच्या ओतूर नगरीत घडली आहे. तथाकथित पुरोगामी मंडळींकडून हिंदूंच्या अन्य सणांप्रमाणे श्राद्धपक्षाच्या संदर्भातही हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करून हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो, हे वरील घटनेवरून लक्षात येते.
‘मृत्यूनंतरचा प्रवास सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी’, यांसाठी श्राद्धविधी करण्यास सांगितले आहेत. व्यक्तीच्या निधनानंतर तिचे श्राद्ध करणे, हे हिंदूंच्या धर्मशास्त्रात सांगितले आहे. हे धार्मिक विधी युगानुयुगे लाखो वर्षे चालू आहेत आणि ते हिंदू आचरणात आणत आहेत. त्यामध्ये मृत्यूनंतर १० व्या दिवशी करायच्या पिंडदान विधीमध्ये पिंडाला कावळा शिवतो, हे अनुभूती सिद्ध आहे. ‘पूर्वजांना केलेल्या पिंडदानाच्या गंधातून ते तृप्त होतात; कारण ते स्वतःही वायूरूप असतात’, हे धर्मशास्त्र सांगते. हिंदु धर्म हा कर्मसिद्धांत मांडणारा आहे. अध्यात्मशास्त्रानुसार श्राद्धामध्ये पिंडदानाच्या माध्यमातून पितरांना आवाहन केले जाते. पितरांच्या अतृप्त इच्छा पिंडाच्या माध्यमातून तृप्त होतात. पितरांचा लिंगदेह पिंडाकडे आकृष्ट होतो, तेव्हा तो रज-तमात्मक लहरींनी भारीत होतो. या लहरींकडे कावळा आकृष्ट होतो. पितर सूक्ष्मरूपात श्राद्धस्थानी येऊन त्यांची तृप्ती झाल्याचे सूचक, म्हणजे पिंडाला कावळा शिवणे. अशा प्रकारे वासना असलेले लिंगदेह आणि माणसे यांच्यामधील कावळा हा एक दुवा (माध्यम) आहे. धर्माने मृत्यूनंतरही मनुष्याची इतकी काळजी वाहिली आहे. अशी आपली महान हिंदु संस्कृती आहे. असे असतांना ‘ही पद्धत चुकीची आहे’, असे म्हणणे योग्य नाही. तथाकथित पुरोगामी मंडळी हिंदु धर्मातील प्रथा-परंपरांवर सातत्याने द्वेषमूलक टीका करून श्राद्धाविषयी विकल्प निर्माण करत आहेत. अमेरिकेतील हॉलीवूड अभिनेते सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांनी भारतात येऊन त्यांच्या मुलाचे श्राद्ध केले होते. अनेक पाश्चात्त्य व्यक्ती भारतातील तीर्थक्षेत्री येऊन श्राद्धादी विधी करतात, तर अनेक विदेशी हे श्राद्धावर संशोधनही करत आहेत. प्रत्यक्ष प्रभु श्रीरामचंद्र यांनी स्वतः राजा दशरथाचे श्राद्ध केल्याची नोंद रामायणात मिळते. त्यामुळे नास्तिकवाद्यांच्या बुद्धीभेदामध्ये न अडकता ंिहंदूंनी श्राद्धविधी करण्यापासून वंचित राहू नये !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे