श्री. चैतन्य बाळकृष्ण तागडे (वय ३४ वर्षे) गेल्या १७ वर्षांपासून साधनारत आहेत. ते वाचकांचे सत्संग घेणे, आरोग्य साहाय्य समितीचा जिल्हा समन्वय करणे, ‘ऑनलाईन’ शिबिर घेणे इत्यादी सेवा करतात.
१. स्थिरता
‘आमच्या काही नातेवाइकांचा साधनेला तीव्र विरोध आहे. चैतन्य मात्र गुरुदेवांवर असलेल्या श्रद्धेमुळे स्थिर रहातो.
२. तत्त्वनिष्ठता
चैतन्य कुटुंबियांच्या चुका तत्त्वनिष्ठपणे आणि प्रेमाने सांगतो.
३. घरकामांत साहाय्य करणे
चैतन्य सेवेत व्यस्त असला, तरी घरातील लहान लहान गोष्टींत आम्हाला साहाय्य करतो. तो प्रतिदिन सायंकाळी सर्वांसाठी चहा बनवतो. महाप्रसाद घेतल्यानंतर स्वतःचे ताट धुवून ठेवतो. केर काढतो. या सर्व कृती तो सेवा आणि साधना म्हणून करतो.’ – सौ. अनुराधा तागडे (श्री. चैतन्य यांची आई), पुणे
४. परिस्थिती स्वीकारणे
‘पूर्वी चैतन्य यांच्यामध्ये पुष्कळ आवडी-निवडी होत्या; पण आता ते परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. दळणवळण बंदीच्या काळात ‘देव आवश्यक आहे, तेवढे देणारच आहे’, असा भाव असल्यामुळे त्यांना त्या परिस्थितीचा ताण आला नाही.
५. सेवेची तळमळ
पूर्वीच्या तुलनेत त्यांचे साधनेचे प्रयत्न वाढले आहेत. पूर्वी त्यांना व्यवसाय किंवा सेवा यांपैकी एक काहीतरी करायला जमायचे. आता व्यवसाय सांभाळून ते सेवाही करतात. व्यवसाय ‘सेवा’ म्हणून करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्यात ‘देवच सर्वकाही करत आहे’, असा भाव वाढलेला जाणवतो.’ – सौ. श्वेता तागडे (श्री. चैतन्य यांची पत्नी), पुणे
६. प्रेमाने आपलेसे करणे
‘चैतन्यमधील प्रेमभावामुळे नातेवाइकांना त्याचा आधार वाटतो. त्याने त्यांच्या संपर्कात असलेल्या धर्मप्रेमींना अल्प कालावधीत प्रेमाने आपलेसे केले आहे.
७. भावपूर्ण सेवा करणे
चैतन्य गणपतीच्या मूर्तींचे वितरण करण्याची सेवा करतो. तो अन्य मूर्ती विक्रेत्यांना साधनेची सूत्रे समजावून सांगतो. तेव्हा मूर्ती विक्रेते आनंद मिळाल्याचे सांगतात. जे मूर्तीकार गणपतीची मूर्ती बनवतात, त्यांना तो ‘यंत्रावर नामजप लावून ठेवा. शास्त्रानुसार मूर्ती बनवली, तर कोणते लाभ होतात ?’, यांविषयी मनावर बिंबवतो. सेवा करतांना अडथळे आल्यावर ‘श्री गणपति ते दूर करणार आहे’, असा त्याचा भाव असतो.
८. गुरुदेवांवर अपार श्रद्धा
अ. वर्ष २०१५ मध्ये त्याचा मोठा भाऊ निखील रुग्णाईत असल्याने अंथरुणावर होता आणि मला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. या कठीण प्रसंगांतही गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा आणि भाव असल्यामुळे चैतन्य स्थिर होता. ‘परात्पर गुरुदेव आपल्यासमवेत आहेत. ते निखीलचीही काळजी घेतील’, अशी त्याची श्रद्धा होती.
आ. सनातन-निर्मित उदबत्ती बनवण्याच्या सेवेची व्याप्ती मोठी आहे. कारखान्यात उत्पादन सेवा करतांना ‘साक्षात् प.पू. गुरुदेव सुचवत आहेत आणि माझ्याकडून करवून घेत आहेत’, असा त्याचा भाव असतो.’ – सौ. अनुराधा तागडे, पुणे (जून २०१०)
सेवा करण्यास तत्पर आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करण्याचा ध्यास असलेले श्री. चैतन्य तागडे यांच्याविषयी पुण्यातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. प्रांजळपणा
‘चैतन्यदादा कुठलीही सेवा करण्यास सिद्ध असतो. कधी सेवा करणे शक्य नसेल, तर तो प्रांजळपणे ‘जमणार नाही’, असे सांगतो.’ – श्री. महेश पाठक
२. इतरांना साहाय्य करणे
अ. ‘रात्री चारचाकी गाडीने स्वारगेट आणि शिवाजीनगर येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे पोचवायचे असतात. साधक उपलब्ध नसतांना चैतन्यला सेवेसाठी कधी आयत्या वेळी विचारल्यास तो लगेच सिद्ध होतो.
आ. माझ्या यजमानांना कधी बरे नसेल आणि ‘मेडिकल स्टोअर’मधून त्यांची औषधे आणायची असतील, तर चैतन्य ती तत्परतेने आणून देतो. त्यामुळे मला त्याचा पुष्कळ आधार वाटतो.’ – सौ. राजश्री खोल्लम
इ. ‘मे २०२० मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा होता. हा सोहळा ‘ऑनलाईन’ दाखवण्यासाठी तांत्रिक जोडणी करावयाची होती. चैतन्यदादाने सेवाकेंद्रातील साधकांना साहाय्य करून त्यांना जोडणी करावयास शिकवले.
३. प्रेमभाव
‘चैतन्यदादा पुण्यातील ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचा ‘ऑनलाईन सत्संग’ घेतो. तेव्हा त्याच्या बोलण्यात आपलेपणा आणि प्रेमभाव जाणवतो.’ – सौ. प्रतिभा फलफले
४. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करण्याचा ध्यास
‘चैतन्यदादा सनातनचे सात्त्विक अत्तर बनवण्याची सेवा करतो. ‘ही सेवा आणखी चांगली कशी होईल ?’, याचा त्याला ध्यास असतो. दादा सभांमध्ये विषय मांडतो किंवा सूत्रसंचालन करतो. तेव्हा समष्टी सेवा परिपूर्ण व्हायला हवी, तसेच समितीचे प्रतिनिधी म्हणून आपण समाजापुढे जाणार, तर ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा व्हायला हवी’, असा त्याचा ध्यास असतो.
५. भावपूर्ण कृती करणे
दादा सहसाधकांच्या साहाय्याने सात्त्विक श्री गणेशमूर्ती समाजापर्यंत पोचवण्याची सेवा तळमळीने करतो. त्या वेळी दादाचा श्री गणेशाप्रती असलेला भाव अनुभवायला मिळतो. ‘सेवेत श्री गणेश कसे साहाय्य करतो ?’, हे सांगताना त्याची भावजागृती होते.
६. कर्तेपणा नसणे
दादाकडेे अनेक विषयांतील कौशल्य (वक्तृत्व, संगीत, उत्तम तबला वाजवणे, मूर्तीकला, संपर्क करणे, इत्यादी) आहे; पण त्याच्या बोलण्यात कर्तेपणा जाणवत नाही. साधकांनी ‘सूत्रसंचालन छान झाले किंवा विषय चांगला मांडला’, असे कौतुक केले, तरी त्याचा अहं वाढलेला दिसत नाही. तो सहजतेने कर्तेपणा परात्पर गुरुदेवांना देतो.’ – सौ. मनीषा पाठक
७. झालेले पालट
अ. ‘आधीच्या तुलनेत दादामध्ये मनमोकळेपणाने बोलण्याचा भाग वाढला आहे. त्याच्याकडून झालेल्या चुका तो लगेच स्वीकारतो.’ – श्री. महेश पाठक
आ. ‘दादा दिवाळीत कुटुंबियांसह रामनाथी आश्रमात जाऊन आल्यापासून त्याच्या प्रयत्नांत अधिक वाढ झाली आहे. तो आता व्यष्टी साधनेचा आढावा नियमित देतो आणि झालेले प्रयत्न प्रामाणिकपणे सांगतो.’ – सौ. प्रतिभा फलफले आणि सौ. मनीषा पाठक (११.६.२०२०)