‘कुंभमेळ्या’विषयीची शास्त्रीय माहिती आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

‘१४.४.२०२१ या दिवसापासून १४.५.२०२१ या दिवसापर्यंत हरिद्वार येथे गंगा नदीच्या तिरावर कुंभमेळा आहे.

१. ‘कुंभमेळा’ शब्दाचा अर्थ

सौ. प्राजक्ता जोशी

संस्कृतमध्ये ‘कुंभ’ या शब्दाचा अर्थ घडा किंवा घट किंवा कलश, तर ‘मेळा’ या शब्दाचा अर्थ ‘यात्रा’ असा आहे. हिंदु संस्कृतीमध्ये कुंभ, घट किंवा कलश पूजनाला विशेष महत्त्व आहे. कलशपूजनाच्या वेळी पुढील मंत्राचे उच्चारण केले जाते.

‘कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः ।
मूले त्वस्य स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ॥

कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ।
ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः ।
अङ्गैश्‍च सहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः ॥

अर्थ : कलशाच्या मुखात श्रीविष्णु, कंठात रुद्र, मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी सर्व मातृगण, कुक्षीमध्ये सात समुद्र आणि सात द्वीपांनी युक्त अशी पृथ्वी सामावलेली आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे वेद त्यांच्या अंगांसह कलशात वास करतात.

२. कुंभमेळ्याची माहिती

‘देव-दानवांनी समुद्रमंथन केले. तेव्हा समुद्रातून अनेक रत्नांसमवेत अमृतकुंभही मिळाला. हा अमृतकुंभ सुरक्षितपणे स्वर्गात पोचवण्याचे दायित्व इंद्राचा पुत्र जयंत याच्यावर सोपवण्यात आले. सूर्य, चंद्र आणि गुरु त्याच्या साहाय्याला होते. अमृतकुंभ स्वर्गात नेत असतांना दैत्यांनी ४ वेळा आक्रमण करून तो मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या चारही वेळी तो कुंभ पृथ्वीवर ठेवून देवांनी दैत्यांचा प्रतिकार केला. त्या वेळी पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी देवांनी तो अमृतकुंभ ठेवला, त्या चार ठिकाणी नद्यांच्या तिरांवर कुंभमेळा भरतो. ती चार ठिकाणे हरिद्वार, प्रयाग, त्र्यंबकेश्‍वर आणि उज्जैन ही आहेत. या चार ठिकाणी ज्या ज्या राशीमध्ये गुरु असतांना कुंभ ठेवला गेला, त्या त्या राशीमध्ये गुरु आला म्हणजे त्या ठिकाणी कुंभमेळा होतो. कुंभ राशीत ‘गुरु’ असता हरिद्वारला, वृषभ राशीत गुरु असता प्रयागला, सिंह राशीत गुरु असता त्र्यंबकेश्‍वर येथे, तसेच गुरु सिंह राशीत; परंतु मेषचा सूर्य, तुळेचा चंद्र आणि वैशाख पौर्णिमा असतांना उज्जैन येथे कुंभमेळा असतो.’

(संदर्भ ग्रंथ : ‘कालसुसंगत आचारधर्म’, प्रकाशक : श्री. अनंत (मोहन) धुंडिराज दाते)

३. कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व

कुंभपर्व हे अतिशय पुण्यकारक असल्यामुळे त्या वेळी स्नानाला विशेष महत्त्व आहे. हरिद्वार येथे गंगा नदीच्या तिरावर, प्रयाग येथे गंगा, यमुना आणि अदृश्य स्वरूपात असलेली सरस्वती या नद्यांच्या संगमावर; त्र्यंबकेश्‍वर येथे गोदावरी नदीच्या तिरावर, तर उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या तिरावर कुंभपर्वात स्नान करतात. कुंभपर्वात तीर्थक्षेत्री स्नान केल्याने पापक्षालन होऊन पुण्यफळ प्राप्त होते. कुंभमेळ्यात भारतातील विविध पिठांचे शंकराचार्य, विविध आखाड्यांचे साधू, महामंडलेश्‍वर, शैव आणि वैष्णव सांप्रदायिक, अनेक विद्वान, संन्यासी, संत-महात्मे एकत्र येतात. यामुळे भाविकांना सत्संगाचा लाभ होतो. कुंभपर्वात केलेले स्नान, दान आणि श्राद्धकर्म विशेष फलदायी ठरते, असे मानले जाते.

४. कुंभमेळ्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

ज्योतिषशास्त्रात सूर्य (रवि) यास आत्माकारक, चंद्र ग्रह मनाचा कारक आणि गुरु ग्रह ज्ञानाचा कारक अन् ‘देवांचा गुरु’ मानले आहे. गुरु ग्रहाला १२ राशींमध्ये भ्रमण करण्यासाठी १२ वर्षे लागतात. गुरु ग्रहाच्या विविध राशींमधील प्रवेशानुसार ४ ठिकाणी प्रत्येक १२ वर्षांनी कुंभमेळा संपन्न होतो. या वर्षी ५.४.२०२१ या दिवसापासून १४.९.२०२१ दिवसापर्यंत गुरु ग्रह कुंभ राशीत आहे. १३.४.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.३२ मिनिटांनंतर रवि ग्रहाचा मेष राशीत प्रवेश झाल्यावर म्हणजे १४.४.२०२१ या दिवसापासून ‘हरिद्वार कुंभपर्वा’ला प्रारंभ होणार आहे.

१४.५.२०२१ या रात्री ११.२४ वाजेपर्यंत रवि ग्रह मेष राशीत (रवि ग्रह मेष राशीत उच्च असतो.) आहे. १४.५.२०२१ या दिवशी हरिद्वार येथील कुंभपर्व समाप्ती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह कुंभ राशीत आणि रवि ग्रह मेष राशीत असेपर्यंत म्हणजे १४.४.२०२१ या दिवसापासून १४.५.२०२१ या दिवसापर्यंत हरिद्वार येथे कुंभमेळा आहे.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा (२.३.२०२१)