पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी पाप, पुण्य आणि त्याचे परिणाम (कर्मयोग) यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज

१. कर्माचे फळ मिळतेच !

‘बकर्‍याला कापून मसाल्यात शिजवून खातात. तसे तुम्हाला कुणी बकर्‍यासारखे शिजवून खाल्ले, तर चालणारका ? अरे, तोही आपल्यासारखा एक जीवच आहे ना ? तो गरीब प्राणी आहे. तो प्रेमामुळे कसे धन्याला (मालकाला) चाटतो ! त्याला काय ठाऊक ? थोड्या वेळाने हाच धनी त्याच्या मानेवर कोयता फिरवणार आहे ! अरे, पुढच्या जन्मी तुम्ही बकर्‍याच्या जन्माला याल. तेव्हा तो तुमच्या मानेवर कोयता ठेवेल. ‘केले कर्म, तेची भोगा आले’, येणारच येणार !’

२. पूर्वजन्मांच्या कर्माचा परिणाम

२ अ. जसे कर्म करणार, तसे भोगावे लागणार; परंतु जीवनात सत्याने चालून धर्माप्रमाणे वागल्यास घरात आनंद आणि शांती मिळेल ! : ‘घरात लंगडी-पांगळी, आंधळी, चोरटी-खोटारडी आणि रोगीट मुले जन्माला का येतात ? त्याचे कारण त्या घराण्याचे पूर्वीचे ७ जन्मांचे साठलेले पापच जन्माला येते. ‘केले कर्म, तेची भोगा आले’, याप्रमाणे पाप केले, तर पापच जन्माला येते. पुण्य केले, तर पुण्यच जन्माला येते. वडिलांनी कुणाची तरी बायको पळवून आणली, तर मुलगाही कुणाची तरी बायको पळवून आणील. ‘बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा घडणारच’; म्हणून ज्यांना आपले चांगले करून घ्यायचे असेल, त्याने जीवनात सत्याने चालावे. धर्माप्रमाणे वागावे आणि परोपकार करावा. नीतीने चालावे, तरच त्याच्या घरात सुख-समाधान, आनंद आणि शांती मिळेल. पाप्याच्या घरी शांती नसते. तिथे कावरेबावरे (गोंधळाचे) वातावरण असते.’

२ आ. पूर्वजन्मीच्या पुण्याईने किंवा पापामुळे श्रीमंत किंवा गरीब घराण्यात जन्म येणे आणि पूर्व पुण्याई अन् पाप भोगावे लागते, हे सत्य असणे : हा जन्म भले कुत्र्याचा मिळाला, तरी त्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईने तो चांगले चांगले खातो, बंगल्यात रहातो आणि गाडीमध्ये फिरतो. दुसरे पुण्य अल्प असणारे कुत्रे गटारात टाकलेल्या ४ – ४ दिवसांच्या शिळ्या भाकर्‍या किंवा चपात्यांना कचरा लागलेला असूनही खाते, हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी प्रतिदिन पहातो. पुण्यापोटी सुख आणि पापापोटी दुःख येते. एक मूल टाटा, बिर्ला, धीरूभाई अंबानी यांसारख्या धनवान कुटुंबात जन्माला येते. त्याला उपजतच भरपूर सुख, बंगला, गाडी आणि भरपूर पैसा मिळतो. तो त्याच्या जन्माच्या आधी साठलेल्या पुण्यामुळे ! दुसरे मूल घर नसलेले, रस्त्यात झोपणार्‍या आणि प्रतिदिन भीक मागून खाणार्‍या भिकार्‍याच्या घरात जन्माला येते. ‘उपजतच भयंकर दारिद्य्र’, असे का बरे होते ? ‘पूर्व पुण्याई आणि पाप भोगावे लागते’, हे सत्य आहे.’

२ इ. स्थूल आणि सूक्ष्म अशी दोन वेगवेगळी जगे असून सूक्ष्म जग देवतांचे, तर स्थूल जग डोळ्याला दिसणारे असणे, स्थूल जगात पाप-पुण्य असणे आणि पुण्यवंत देवापाशी रहाणे, तर पापी मनुष्याला नरकात जावे लागणे : अव्यक्त निराकार देवतांचे स्थान सूक्ष्म जग आहे. सूक्ष्म बुद्धी किंवा सूक्ष्म दृष्टी यांद्वारे पाहिल्यास ते दिसेल. दुसरे जे जग आहे, त्याला जीवसृष्टी म्हणतात. ते ८४ लक्ष योनींचे जग आहे. ते आमचे-तुमचे जग आहे; मात्र या आमच्या जगात पाप-पुण्याचे पीक येते. देवांच्या राज्यात वरती पाप-पुण्याचे पीक नसते. जे पुण्यात्मे मेल्यावर येथून वरती जातात, त्यांना देव चांगली जागा देतात. त्यांना सुखाची जागा मिळते. ते पुण्यात्मे देवाजवळ वरती रहातात. बाकीच्या पापी आत्म्यांना मेल्यावर नरकामध्ये ढकलले जाते.’

– पू. (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)