नागपूर – ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा अनियंत्रित वापर होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यातील फार्मसीतून ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश ७ एप्रिल या दिवशी दिला. त्यामुळे आता या इंजेक्शनचा केवळ कोरोना रुग्णालय किंवा रुग्णालयातील फार्मसीला स्टॉकिस्टकडून पुरवठा होणार आहे.
शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांत ‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनचा वापर अनियंत्रितपणे होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या. त्यामुळे भविष्यात ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने फार्मसीतून ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनची विक्री अव्वाच्या सव्वा दराने केली जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे गरजू रुग्णांना हे इंजेक्शन सहजतेने उपलब्ध होईल. या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा, यासाठी पुरवठादारांवर देखरेख असणार आहे. पुरवठ्यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे आणि अन्न अन् औषधी प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त पुष्पहार बल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.