धर्मनिरपेक्ष लोकशाहीची थट्टा !

बंगालच्या कुचबिहार येथे निवडणुकांच्या निमित्ताने नुकत्याच आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘ज्या प्रकारे ममता बॅनर्जी यांनी ‘बंगाली मुसलमानांनी केवळ तृणमूल काँग्रेसला मत देण्या’चे आवाहन केले आहे, त्याच प्रकारे आम्ही ‘हिंदूंनी भाजपला मत द्यावे’, असे आवाहन केले असते, तर एव्हाना निवडणूक आयोगाने आम्हाला अनेक नोटिसा पाठवल्या असत्या. भारतभरातील प्रसारमाध्यमांनी आमच्या विरोधात संपादकियांवर संपादकीय लिहिली असती !’ पंतप्रधानांच्या या सूचक वक्तव्यात अनेक गोष्टी लपलेल्या आहेत.

नरेंद्र मोदी

धर्मनिरपेक्ष कि मुसलमानप्रेमी ?

भारतीय राजकारणाच्या सर्वोच्च पदी विराजित असलेल्या मोदी यांनी केलेल्या या वक्तव्यातून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदुद्वेषाचे पोटशूळ उठलेली मंडळी कशा प्रकारे प्रत्येक स्तरावर हिंदूंना ‘लक्ष्य’ करण्यास प्रयत्नशील असतात, हे लक्षात येते. ‘राजकीय स्तरावर मुसलमानांचे एकीकरण झालेले निवडणूक आयोगासारख्या एका ‘नि:पक्षपाती’ सरकारी संस्थेला चालते’, असेच पंतप्रधानांना यातून सुचवायचे आहे. दुसरीकडे हिंदूंचे राजकीय संघटन मात्र आयोगाच्या पचनी पडणार नाही, असे त्यामुळे म्हणण्यास वाव रहातो. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचा विचार करता हिंदूंच्या विरोधात गरळओक करण्यात प्रसारमाध्यमांची चढाओढ चालू असणे, हे नेहमीचेच झाले आहे. मग तो हिंदूंच्या सणांना ‘अंधश्रद्धे’चा भाग म्हणण्याचा प्रकार असो किंवा हिंदु समाज हा हिंसक असण्याचे निराधार आरोप करण्याचा भाग असो !

ममता यांची पोटदुखी !

डावीकडून: ममता बॅनर्जी,असदुद्दीन ओवैसी

पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा सूक्ष्मतेने विचार करता एक अधिक भयावह वास्तव समोर येते. धर्मनिरपेक्ष भारताच्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने एका धर्माच्या अनुयायांना तिच्या पक्षाला मत देण्याचे उघड उघड आवाहन करणे, हे अत्यंत गंभीर सूत्र आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुसलमानांची मते विभागली जाण्याचा विचार सतावू लागला आहे. बंगालची जवळपास ३० टक्के लोकसंख्या ही मुसलमान असून गेले दशकभर तृणमूल काँग्रेससाठी ती एकगठ्ठा मते राहिलेली आहेत. यातही दक्षिण बंगालमधील हुगली, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा अन् हावडा या ४ मुसलमानबहुल जिल्ह्यांची काळजी तृणमूलला लागली आहे. राज्यातील मुसलमानांच्या एकूण लोकसंख्येपैकी २५ टक्के मुसलमान या ४ जिल्ह्यांत वास्तव्य करत असून या क्षेत्रात विधानसभेचे एकूण एक तृतीयांश म्हणजे तब्बल ९८ मतदारसंघ आहेत. वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीचा विचार करता येथील १४ मतदारसंघांपैकी ११ वर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी होऊन संसदेत पोचले. आता मात्र हुगली जिल्ह्यातील फुरफुरा शरीफ या गावातून तृणमूलच्या राजकीय आकांक्षांना मारक असे राजकारण जोरात चालू असून मुसलमानांची मते विभागण्याचा प्रयत्न होत आहे, असे म्हणता येईल. नेमके हेच ममता यांच्या पोटाचे दुखणे आहे. फुरफुरा शरीफ येथील प्रसिद्ध दर्गा हा बंगाली मुसलमानांच्या श्रद्धेचे केंद्र असून दर्ग्याच्या प्रमुखांपैकी एक प्रभावशाली व्यक्तीमत्त्व असलेले अब्बास सिद्दीकी पीरजादा हे राजकारणात स्वतःची शक्ती आजमावत आहेत. ‘या दर्ग्यातून आलेला अधिकृत संदेश विधानसभेच्या ९८ जागांवर परिणाम करू शकतो’, असे म्हटले जात आहे. गंमत म्हणजे पीरजादा यांनी स्थापन केलेल्या नव्या राजकीय पक्षाने (ज्याला अजून नाव द्यायचे शेष आहे) काँग्रेस आणि साम्यवादी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. भाग्यनगर येथील कट्टर मुसलमानसमर्थक असदुद्दीन ओवैसी यांनीही निवडणुकीत उडी घेतल्याने ममता यांच्या तृणमूलचे धाबे दणाणले आहेत. मुसलमानी मतांची विभागणी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत असल्यानेच संयमी आणि मुत्सद्दी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ममता यांचा पुरता गोंधळ उडालेला दिसतो. त्यामुळेच त्या बंगालमधील मुसलमानांना थेट आवाहन करत त्यांची एकगठ्ठा मते तृणमूलच्या पदरी घालण्याची भीक मागत आहेत.

धोक्याची घंटा !

खरेतर हीच धोक्याची घंटा आहे. निवडणुका म्हटल्या की, काळ्या पैशाचा सर्रास वापर हा आलाच, ही दयनीय स्थिती आपण जाणतोच; परंतु आतापर्यंत अनेक राजकीय पक्ष हे मतदारांना भुलवून आपल्याकडे खेचण्यासाठी एखाद्या प्रचारसभेच्या व्यासपिठावरून अथवा पत्रकार परिषदेतून अधिकृतपणे नव्हे, तर अनधिकृतरित्या पैसे देऊन, दारू-जेवण देऊन आपल्याकडे ओढत असत. आता मात्र राजकीय पक्ष आपली अधिकृत भूमिका म्हणून मुसलमानांना चुचकारत त्यांची मते थेट मागत आहेत. मुसलमान अनुनयाचा नि राष्ट्रद्रोहाचा हा परिपाक आहे, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ? एके ठिकाणी प्रचारसभेत मुसलमानांना संबोधतांना बॅनर्जी म्हणाल्या, ‘तुम्हाला ‘एन्.आर्.सी.’ (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी प्रक्रिया) लागू होऊ नये, असे वाटत असेल, तर आम्हालाच मत द्या !’ केवळ भारतीय मुसलमानच नव्हे, तर संपूर्ण भारताचे हित सामावलेल्या ‘एन्.आर्.सी.’ला अशा प्रकारे विरोध करणे, हा राष्ट्रद्रोह आहे.

मुसलमानी लांगूलचालन !

अब्बास सिद्दीकी पीरजादा

फुरफुरा शरीफचे ३३ वर्षीय अब्बास सिद्दीकी पीरजादा यांचा विचार केल्यास त्यांनी दक्षिण बंगालमध्ये प्रचारसभांचा सपाटाच लावला आहे. मुसलमानी जनतेला आपल्या सभांमध्ये मोठ्या प्रमाणात ओढण्यात यशस्वी झालेले पीरजादा हे ‘काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांसारख्या तथाकथित ‘धर्मनिरपेक्ष’ राजकीय पक्षांनी मुसलमान समुदायाचा वापर केवळ मते मिळवण्यासाठीच केला आहे. त्यामुळे आपला समाज सोयीसुविधांपासून नेहमीच वंचित राहिला आहे’, असे म्हणत आहेत. ‘इमानदार मुसलमान भाई’ संबोधून येथील मुसलमानांना चुचकारत पीरजादा एक प्रकारे धर्मांध शक्तींना जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणण्यास अडचण नसावी.

या सर्वांतून बंगालच्या राजकीय रणधुमाळीने किती खालचा स्तर गाठला आहे, हे प्रत्ययास येते. ही लोकशाहीची थट्टाच असून जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करून नव्हे, तर धर्माधारित मते मागून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न होणे, हे पूर्णत: निषेधार्हच आहे, हे लक्षात घ्या.