
नवी देहली – मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणातील आरोपी तहव्वुर हुसेन राणा याला लवकरच अमेरिकेतून भारतात आणले जाणार आहे. भारतीय अन्वेषण यंत्रणांची अपेक्षा आहे की, त्याच्या चौकशीतून या आतंकवादी आक्रमणात पाकिस्तानचा सहभाग उघड होऊ शकतो. या आक्रमणात पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे मेजर इक्बाल आणि मेजर समीर अली यांसारखे अधिकारी सहभागी होते. तसेच आक्रमणाच्या कटात हाफीज सईद (लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख), झकी-उर-रहमान लखवी, साजिद मजीद, इलियास काश्मिरी आणि अब्दुल रहमान हाशिम सईद उपाख्य मेजर अब्दुल रहमान (पास्सा) यांची नावेही समोर आली आहेत.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने तहव्वुर राणा याच्यावर या आक्रमणातील अन्य एक आरोपी डेव्हिड हेडली याला भारतात रहाण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी सुविधा पुरवल्याचा आरोप आहे. महत्त्वाच्या ठिकाणींची माहिती गोळा करण्यातही त्याचा सहभाग आहे. राणा याचे लष्कर-ए-तोयबा आणि हरकत-उल्-जिहादी-इस्लामी या आतंकवादी संघटनांशी संबंध आहेत.
तहव्वुर राणा परतल्यानंतर पुढील प्रक्रिया !
तहव्वुर राणा याला भारतात आणल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी त्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोठडीत ठेवले जाईल. त्याने कोणत्या ठिकाणांची माहिती गोळा केली ?, हे अन्वेषण यंत्रणा शोधण्याचा प्रयत्न करतील. त्याचा कोणत्या पाकिस्तानी अधिकार्याशी थेट संपर्क होता ? हेडली आणि इतर आतंकवाद्यांशी झालेल्या संभाषणात त्याने कोणत्या योजना आखल्या होत्या? याचीही माहिती घेतली जाईल.