अटक करण्यात आलेल्या आरोपींचे केवळ आडनाव पुजारी असल्याचा खुलासा !

धाराशीव – गेल्या काही वर्षांपूर्वी तुळजापूर परिसरात असलेले अमली पदार्थांचे प्रकरण उघडकीस आले आहे. वस्तूत: या प्रकरणात ज्यांना अटक झाली आहे, त्यांची केवळ आडनावे ‘पुजारी’ आहेत. तरीही त्यांना ‘श्री भवानीदेवीचे पुजारी’, असे संबोधले जात आहे. काही प्रसिद्धीमाध्यमांमध्ये या प्रकरणी चुकीची वृत्त प्रसारित होत असून श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजार्यांची अपकीर्ती थांबवावी, अशी मागणी ‘श्री तुळजाभवानी पुजारी मंडळा’चे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी केली आहे.
दोषींवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र पुजार्यांची अकारण अपकीर्ती कशासाठी ? – अमरराजे अंबादासराव कदम-परमेश्वर
या प्रकरणी ‘श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळा’चे अध्यक्ष श्री. अमरराजे अंबादासराव कदम-परमेश्वर म्हणाले, ‘‘या प्रकरणात जे दोषी असतील, ‘त्यांना पाठिशी घाला’, असे आम्ही कधीच म्हणत नाही; मात्र अकारण पुजार्यांची अपकीर्ती कशासाठी ? आमच्या परिवारातील अनेकांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही, ही वस्तूस्थिती आहे; मात्र हे कुणीही मांडत नाही. अंमली पदार्थ प्रकरण तडीस गेले पाहिजे आणि दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, या मताचे आमचे मंडळ आहे. या संदर्भात लवकरच आम्ही जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार आहोत.’’
या संदर्भात ‘पाळीकर मंडळा’चे अध्यक्ष विपीन शिंदे म्हणाले, ‘‘खरे पहाता गेल्या ३ वर्षांपूर्वी अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पहिल्यांदा पुजारी मंडळाने आवाज उठवला होता. आता अमली पदार्थ प्रकरणात जी नावे येत आहेत, त्यांचा देवीच्या पूजेशी काही संबंध नाही. असे असतांना काही ठिकाणी जाणीवपूर्वक ‘अमली पदार्थ प्रकरणी श्री तुळजाभवानीदेवीच्या पुजार्यांशी संबंध’, अशी वृत्ते प्रसारित करण्यात येत आहेत.’’