Trump’s Tariff On Pharma Imports : डॉनल्ड ट्रम्प औषधांवरही आयात शुल्क आकारणार !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन  (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काचे धोरणा घोषित केल्यानंतर त्यात औषधांना वगळण्यात आले होते; मात्र ट्रम्प यांनी आता घोषित केले आहे की, ते लवकरच औषधांवरही मोठे शुल्क आकारणार आहे.

ट्रम्प म्हणाले की, इतर देश औषधांचे मूल्य अल्प ठेवण्यासाठी फार दबाव आणतात. तिथे ही आस्थापने स्वस्त औषधे विकतात; पण अमेरिकेत असे होत नाही.  लंडनमध्ये ८८ डॉलर्सना (७ सहस्र ६२८ रुपयांना) मिळणारे औषध अमेरिकेत १ सहस्र ३०० डॉलर्सना (१ लाख १२ सहस्र ६९६ रुपयांना) विकले जात आहे. आता हे सर्व संपेल. एकदा या औषध आस्थापनांवर आयात शुल्क लादले की, या सर्व आस्थापने अमेरिकेत परत येतील; कारण अमेरिका ही एक फार मोठी बाजारपेठ आहे. जर असे झाले नाही, तर परदेशी औषध आस्थापनांना मोठे कर भरावे लागतील.

भारतातून ४० टक्के जेनेरीक औषधे अमेरिकेत होतात निर्यात !

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या मते, अमेरिकेत वापरल्या जाणार्‍या सर्व जेनेरिक औषधांपैकी अनुमाने ४० टक्के औषधे भारतातून आयात केली जातात. भारतातून निर्यात होणार्‍या औषधांमध्ये रोगप्रतिकारक, अँटीडिप्रेसेंट्स आणि हृदयरोग यांवरील औषधांचा समावेश आहे. वाढीव करांमुळे रुग्णांना महागडी औषधे घ्यावी लागतील, ज्यामुळे अमेरिकेतील लोकांच्या समस्या वाढतील.

अमेरिकेतून भारतात आयात केल्या जाणार्‍या औषधांवर भारत १०.९१ टक्के आयात शुल्क आकारतो; मात्र अमेरिका भारताकडून आयात केल्या जाणार्‍या औषधांवर कोणत्याही प्रकारचे आयात शुल्क आकारत नाही. याआधी ट्रम्प यांनी आयात शुल्कात वाढ केली, तेव्हा त्यांनी औषधांना त्यातून वगळले होते.