देवद आश्रमातील सौ. मीरा कुलकर्णी यांचा फाल्गुन कृष्ण सप्तमी या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने सहसाधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. ठरवलेल्या दिनक्रमाप्रमाणे वागणे
‘सौ. मीरा कुलकर्णीकाकू नियमित व्यायाम करतात. त्या या वयातही दुपारी झोपत नाहीत. त्या सलग कार्यरत असतात. सेवांच्या व्यस्ततेतही त्या ग्रंथवाचन करतात. त्यांचे स्वतःचे नियोजन व्यवस्थित असते.
२. अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणे
अ. सौ. कुलकर्णीकाकूंना एखादी सेवा दिली की, काकू त्या सेवेतील बारकाव्यांचा अभ्यास करून नियोजन करतात. काकू दूरदृष्टीने सेवा करतात. त्यांनी केलेल्या सेवेत अचूकता असते, तसेच त्यांचे नियोजनही योग्य असते. पूर्वी ग्रंथ विभागात केंद्रीय वाचनालयाला ग्रंथ देण्याची सेवा प्रलंबित होती. काकूंनी ही सेवा चिकाटीने पूर्ण केली आणि आताही त्यांना वेळेवर ग्रंथ कसे देऊ शकतो, या दृष्टीने त्यांनी सेवेची घडी बसवली. यातून त्यांच्यातील अभ्यासपूर्ण कृती करणे, सेवेची चिकाटी, परिपूर्णतेची तळमळ आणि दूरदृष्टी इत्यादी गुण लक्षात येतात.
आ. काकू कोणतीही सेवा करतांना त्यातील सर्व बारकाव्यांचा विचार करून ती सेवा पूर्ण करतात आणि सहसाधकांनाही तसे करण्यास प्रवृत्त करतात. ग्रंथांची मागणी काढल्यावर रिकाम्या झालेल्या पिशव्यांची सेलोटेप लगेच काढून त्या स्वच्छ करून ठेवतात. रिकामे झालेले खोके दुमडून त्या त्या वेळी वर्गीकरण करून जागेवर ठेवतात.
इ. एखाद्या ग्रंथाचा प्रत्यक्ष साठा आणि संगणकातील नोंद यात जर भेद (तफावत) लक्षात आला, तर काकू तो तत्परतेने शोधतात आणि मुळापर्यंत जाऊन नेमकी चूक कुठे झाली, ती शोधून तिथे सुधारणाही करतात.
३. सहसाधकांची प्रकृती स्वीकारून त्यांच्याशी प्रेमाने वागणे
काकूंना पूर्वी सहसाधकांकडून अपेक्षा असायच्या. त्यामुळे त्यांना सहसाधकांची प्रकृती स्वीकारता येत नसे. काकूंच्या मनात साधकांविषयी प्रतिक्रिया असायच्या. आता काकूंनी ‘प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते’, हे लक्षात घेऊन सहसाधकांना पूर्णपणे स्वीकारले आहे. त्या साधकांना प्रेमाने हाताळण्याचा प्रयत्न करतात.
४. प्रेमभाव
४ अ. आश्रमातून बाहेरगावी जाणार्या साधकांचा विचार करून स्वतःहून डबा बनवून देणे : साधक गावाला जाणार असल्यास आणि पहाटे कधीही डबा हवा असेल, तरी सौ. मीराकाकू डबा बनवून देतात. काही वेळा साधक त्यांना डबा हवा असल्याचे स्वतःहून सांगत नाहीत, अशाही साधकांना काकू स्वतःहून विचारतात आणि त्यांना डबा बनवून देतात. ‘गावाला जाणार्या साधकाच्या वयाचा विचार करून त्यांना काय आवडते आणि प्रवासात काय सोयीचे होईल’, याचा विचार करून डब्यासाठीचा पदार्थ बनवतात अन् त्या साधकाला डबा भरूनही देतात.’ – सेवेत समवेत असणारे साधक
४ आ. रुग्णाइत साधिकेची विचारपूस करून तिला घावन बनवून देणे : ‘एकदा मी रुग्णाइत असल्याने मला जेवण जात नव्हते. तेव्हा काकूंनी स्वतःहून माझी विचारपूस केली आणि मला घावन करून दिले. त्या वेळी ‘सेवा अधिक आहेत आणि सेवा करणारे साधक अल्प आहेत’, असा विचार न करता त्यांनी स्वतःहून मला साहाय्य केले.’ – सौ. अक्षरा शिंदे
४ इ. अल्पाहार बनवणार्या साधकांची अडचण स्वतःहून समजून घेऊन त्यांना साहाय्य करणे
१. ‘एकदा माझ्याकडे पथ्याचा अल्पाहार बनवण्याची सेवा होती. तेव्हा मला त्रास होत होता. काकू सकाळी फिरायला आल्यावर त्यांनी माझी स्थिती पाहिली आणि मला स्वतःहून साहाय्य केले.
२. एकदा आम्ही तीन साधक अल्पाहाराची पूर्वसिद्धता करत होतो. तेव्हा स्वयंपाकघरातील साधिकांनी आम्हाला ऐनवेळी तोंडली चिरण्यास सांगितली. आम्हाला ते शक्य नव्हते. काकू तेथे सहज आल्या असतांना त्यांना आमची अडचण लक्षात आली आणि त्यांनी आम्हाला तोंडली चिरण्यास साहाय्य केले.’ – सौ. अंजली झरकर
४ ई. सहसाधकांचे नामजपादी उपाय पूर्ण होण्याकडे लक्ष देणे : ‘काकू नियमित सहसाधकांच्या नामजपादी उपायांचा आढावा घेतात. त्या सहसाधकांचे उपाय पूर्ण होण्याकडे कटाक्षाने लक्ष देतात. सेवांचे नियोजन करतानांही प्राधान्याने उपायांचे नियोजन करतात.
५. व्यष्टी साधना नियमितपणे करणे
काकूंचा व्यष्टी साधनेचा आढावा सद्गुरु राजेंद्र शिंदे घेतात. आरंभी काकूंचे प्रयत्न बुद्धीच्या स्तरावर असायचे; पण आता काकू भावाच्या स्तरावर प्रयत्न करतात. त्यांच्या व्यष्टी साधनेत कधीही खंड पडत नाही. त्या त्यांचा आढावाही वेळेत पाठवतात. त्यांना सांगितलेले प्रयत्न त्या मनापासून स्वीकारून करतात.’
– सेवेत समवेत असणारे साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल (२५.३.२०२१)