कोरोना नियमांचे उल्लंघन आणि सभागृहाचा अवमान केल्याच्या प्रकरणी पनवेल महापालिकेतील १५ नगरसेवकांचे निलंबन !

तणाव वाढल्याने पोलिसांना पाचारण

पनवेल – येथील महापालिकेची महासभा ‘ऑनलाईन’ न घेता ‘ऑफलाईन’ पद्धतीने घेण्याची मागणी करणे आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन, तसेच सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवून महापालिकेतील १५ नगरसेवकांचे १ मासासाठी निलबंन करण्यात आले. ५ एप्रिल या दिवशी महासभा ‘ऑनलाईन’ चालू असतांना हे नगरसेवक महापालिकेच्या सभागृहात गेले. यामध्ये १४ नगरेसवक हे महाविकास आघाडीचे आणि १ नगरसेवेक भाजपचा आहे.

महापालिकेची महासभा ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेत असतांना महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी वाढीव मालमत्ता कराला विरोध केला, तसेच महासभा ‘ऑनलाईन’ पद्धतीने न घेता ती ‘ऑफलाईन’ पद्धतीने घ्यावी, अशी मागणीही केली. १५ नगरसेवकांचे निलंबन केल्यानंतर या सर्व नगरसेवकांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात येत होते; मात्र त्यांनी सभागृहाच्या बाहेर न जाता वाढीव मालमत्ता कराला विरोध केला. या कारणामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर येथे काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

‘सेंट्रल पार्क’ बंद ठेवण्याचे आदेश

खारघर येथील ‘सेंट्रल पार्क’मध्ये सहस्रोंच्या संख्येने फिरायला येणारे नागरिक ‘मास्क’चा वापर, सामाजिक अंतर आणि ‘सॅनिटायझर’चा वापर करत नव्हते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता होती. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यात खारघर नोडमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पुढील आदेशापर्यंत ‘सेंट्रल पार्क’ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.