साडेतीन वर्षांत शासनाकडून भोजन आणि पार्ट्या यांवर ४ कोटी ६३ लाख रुपये खर्च

सरकारी कार्यक्रमांतील भोजन आणि पार्ट्या यांवर कोट्यावधी रुपये खर्च

पणजी, २८ मार्च (वार्ता.) – एप्रिल २०१७ ते आतापयर्ंत सरकारी कार्यक्रमांतील भोजन आणि पार्ट्या यांवर तब्बल ४ कोटी ६३ लाख ५० सहस्र ५९४ रुपये खर्च करण्यात आले आहेत. शिष्टाचारमंत्री मावीन गुदिन्हो यांनी ही माहिती विधानसभेत एका अतारांकित प्रश्‍नावरील लेखी उत्तरात दिली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी हा प्रश्‍न विचारला होता.

मंत्री आणि आमदार यांच्यासाठी आयोजित पार्ट्या, सरकारच्या वतीने आयोजित कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, केंद्रीय मंत्री गोव्यात आल्यानंतर झालेल्या पार्ट्या, भोजन आणि अल्पाहार (न्याहरी) यांवर हा खर्च झाला आहे. शिष्टाचारमंत्री मावीन गुदिन्हो उत्तरात पुढे म्हणतात, ‘‘या पार्ट्या, भोजन आणि अल्पाहार यांचे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचे आल्तिनो येथील सरकारी निवासस्थान, विधानसभा संकुल, राज्यातील तारांकित हॉटेल्स आणि पणजी बाहेरील शहरातही झाल्या आहेत.

यातील सर्वाधिक खर्च २ कोटी ३० लाख ८० सहस्र ८०० रुपये हा १९ आणि २० सप्टेंबर २०१९ मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात आणि ताळगाव कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या ३७ व्या ‘माल आणि सेवा कर’ मंडळाच्या (जी.एस्.टी. काउन्सिल) बैठकीवर झाला आहे. एप्रिल २०१७ ते आतापर्यंत एकूण १६७ जण राज्य अतिथी म्हणून गोव्यात येऊन गेले आहेत. त्यांचा प्रवास आणि निवास यांच्यासाठी सरकारने ७८ लाख ६६ सहस्र १३२ रुपये खर्च केले आहेत, तसेच माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात १ एप्रिल २०१७ ते १७ मार्च २०१९ या कालावधीत भोजन आणि पार्ट्या यांवर २८ लाख १ सहस्र ७३४ रुपये, तर विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात आतापर्यंत ४ कोटी ३५ लाख ४८ सहस्र ८६० रुपये खर्च करण्यात आले आहेत.’’