उपवनरक्षक विनोद शिवकुमार यांना फाशी द्या ! – आक्रमक महिलांची मागणी

  • दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

  • वनविभागाच्या महिलांचे आंदोलन

अमरावती – मेळघाटातील गुगामल वन्यजीव परिक्षेत्रातील महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून २५ मार्चच्या रात्री रहात्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी दीपाली यांनी लिहिली होती. त्यानंतर धारणी पोलिसांनी शिवकुमारला अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला. त्यानंतर २७ मार्च या दिवशी आरोपी विनोद यांना धारणी येथील न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. वनविभागातील महिला कर्मचारी आणि स्थानिक महिला यांनी ‘आरोपी शिवकुमार यांना कह्यात देण्याची मागणी करत आरोपीला फाशी द्या’, अशा घोषणा दिल्या.

आरोपी शिवकुमार यांना न्यायालयात नेतांना महिला मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या होत्या. या वेळी पोलिसांनी मानवी साखळी करून आरोपीला न्यायालयात उपस्थित केले. ज्या वाहनांतून आरोपी विनोद शिवकुमार यांना पोलीस धारणी न्यायालयाकडे घेऊन जात होते, त्या वाहनाला महिलांनी पूर्णपणे घेरले होते. या वेळी ‘आरोपीला आमच्या कह्यात द्या’, अशी मागणी वनविभागाच्या महिला कर्मचारी वर्गाने केली.

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्याकडेही तक्रार करूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे रेेड्डी यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी २६ मार्च या दिवशी दिवसभर दीपाली चव्हाण यांच्या संतप्त नातेवाइकांनी आक्रोश करून मृतदेहाचे शवविच्छेदन करणार नसल्याचे सांगितले. ‘माझ्या मुलीचा जीव गेला आहे. त्यामुळे शिवकुमार यांना माझ्या डोळ्यादेखत फासावर लटकवा’, अशी मागणी दीपाली यांच्या आईने केली होती. सायंकाळी ५ वाजता दीपालीच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणी विनोद शिवकुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.