|
नागपूर – येथील शासकीय रुग्णालयात आकस्मिक रोग विभागात एकाच खाटावर २ रुग्णांना झोपावे लागत आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असतांना खाट मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. शासकीय रुग्णालयात खाट मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्भवली असतांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नाही. सामान्य कुटुंबांना शहरातील शासकीय रुग्णालयातही खाट मिळत नाही, असा आरोप कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांकडून केला जात आहे, शहरातील गंभीर परिस्थितीला राज्य सरकार उत्तरदायी असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत परिस्थिती अधिक गंभीर !
मागील वर्षात कोरोना प्रकोपाच्या काळापेक्षा परिस्थिती अधिक गंभीर होत चाललेली आहे. एका दिवसात सर्वाधिक १७ सहस्र कोरोना चाचण्या आणि ४ सहस्र पार बाधित रुग्ण मिळण्याचा अहवाल बिकट परिस्थिती दर्शवणारा आहे. जिल्ह्यात २६ मार्चच्या अहवालात ४ सहस्र ९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यामध्ये एकट्या नागपूर शहराची संख्या २ सहस्र ९६६ इतकी आहे.
खासगी रुग्णालयात खाट वाढण्याचा प्रयत्न !
महापालिकेने खासगी रुग्णालयांत कोरोना बाधितांसाठी अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे शासकीय रुग्णालयावरील ताण अल्प होणार आहे. खाट रिकामे असल्यास कोणत्याही रुग्णाला परत पाठवू नये, अशा स्पष्ट सूचना महापालिका प्रशासनाने रुग्णालयांना दिल्याचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले आहे.