नारगोलकर कुटुंबियांकडून नवोदित शाहीर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन !

पुणे – नारगोलकर कुटुंबीय महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सहकार्याने गेली १५ वर्षे शिवजयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे तुकाराम बीजेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे उपासक आणि त्यांचे अनुयायी शाहीर जयराम गंगाधर नारगोलकर यांच्या नावाने महाराष्ट्रातील नवोदित शाहिराला पुरस्कार देतात. मानपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लॅमिनेशन केलेले छायाचित्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शाहीर नारगोलकर हे महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

दरवर्षी हा कार्यक्रम पुण्यातील भवानी मंदिरात होतो; मात्र यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे हा कार्यक्रम मंदिरात न होता घरी होणार आहे. त्यामुळे हितचिंतकांनी मंदिरात न येता या कार्यक्रमासाठी नारगोलकर कुटुंबियांना मनोमन आशीर्वाद द्यावेत आणि पुरस्कारार्थीचे अभिनंदन करावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी केले आहे.