कुंकळ्ळी नगरपालिका वगळता सर्वत्र भाजप पुरस्कृत गटाचे वर्चस्व

  • पालिका निवडणूक

  • कुंकळ्ळीत काँग्रेस पुरस्कृत गटाला बहुमत, तर वाळपई, पेडणे आणि पणजी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस खाते उघडण्यातही अपयशी

सर्वत्र भाजप पुरस्कृत गटाचे वर्चस्व

पणजी, २२ मार्च (वार्ता.) – नगरपालिकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात भाजपने काणकोण, कुडचडे, डिचोली, वाळपई आणि पेडणे या नगरपालिकांवर, तसेच पणजी महानगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले. कुंकळ्ळी नगरपालिकेवर काँग्रेसचे नेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुरस्कृत गट विजयी झाला.

विजयाविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर त्यांचा विश्‍वास दर्शवला आहे.’’ पालिका निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे वाळपई, पेडणे आणि पणजी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस खाते उघडण्यासही अपयशी ठरले आहे. नगरपालिका निवडणूक जरी पक्षपातळीवर घेतली गेलेली नसली, तरी भाजपने त्यांचे गट प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरवले होते.

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे

भाजपने पणजी महानगरपालिकेतील ३० पैकी २५ जागा जिंकल्या

 

१. पणजीचे आमदार तथा भाजपचे नेते आतानासियो मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील गटाने पणजी महानगरपालिकेतील ३० पैकी २५ जागा जिंकल्या, तर ‘आमी पणजीकर’ गटाचे ४ आणि १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. पणजी महापालिका निवडणुकीत भाजपमधील बंडखोरांविषयी लवकरच निर्णय घेणार. सुरेंद्र फुर्तादो यांना बंडखोरांनी दिलेली साथ चुकीची, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

२.  वाळपई नगरपालिकेच्या सर्व १० ही जागांवर भाजपचे नेते तथा आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे समर्थक उमेदवार निवडून आले आहेत.

३. डिचोली नगरपालिकेतील १४ पैकी ९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, २ जागांवर सावळ पुरस्कृत उमेदवार, तर अपक्ष आणि ‘व्हिजन’ यांचा प्रत्येकी १ उमेदवार निवडून आला आहे. विजयी झालेल्या एका अपक्ष उमेदवाराने भाजप गटाला पाठिंबा घोषित केला आहे.

४. पेडणे नगरपालिकेतील १० पैकी ६ जागांवर भाजपपुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत, तर उर्वरित ४ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. निकालानंतर प्रभाग १ आणि प्रभाग ७ मध्ये निवडून आलेल्या अपक्ष उमेदवारांनी भाजपच्या गटाला पाठिंबा घोषित केेला आहे.

५. कुडचडे-काकोडा नगरपालिकेवर १५ पैकी ११ जागांवर वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत, तर उर्वरित ठिकाणी ‘स्वाभिमान’ गट, अपक्ष आणि आप पुरस्कृत प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाला आहे.

६. काणकोण नगरपालिकेत सर्व १२ जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत.

७. कुंकळ्ळी नगरपालिकेत काँग्रेसचे नेते युरी आलेमाव पुरस्कृत गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. युरी आलेमाव पुरस्कृत गटाने १४ पैकी ९ जागांवर विजय संपादन केला आहे, तर उर्वरित ५ जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत.

८. नावेली जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार एडवीन कार्दोझ यांनी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो, भाजपचे सत्यविजय नाईक आणि आपच्या मातील्डा डिसिल्वा यांचा पराभव केला.

९. सांखळी नगरपालिकेच्या प्रभाग ९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सगलानी गटाचा उमेदवार रमेश आमशेकर यांनी मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत यांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवाराचा पराभव केला. या प्रभागात भाजप पुरस्कृत उमेदवार कधीच निवडून आला नव्हता, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावर म्हटले आहे.

पालिका निवडणुकीतील अन्य काही घडामोडी

पक्षविरोधी कारवाया करणार्‍यांवर कारवाई होणार ! – सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

पालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

निवडणूक आचारसंहिता रात्रीपासून उठवणार

६ नगरपालिका, पणजी महानगरपालिका, नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघ, सांखळी नगरपालिकेचा एक प्रभाग, विविध पंचायतींचे एकूण १८ प्रभाग यांमध्ये लागू करण्यात आलेली निवडणूक आचारसंहिता २२ मार्चच्या रात्रीपासून उठवण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारीपासून ही आचारसंहिता लागू झाली होती.