|
पुणे, २२ मार्च – प्रतिमहा १०० कोटी रुपये जमवून द्या, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. तुमच्या गृहमंत्र्यांना मासाला १०० कोटींची वसुली हवी आहे, ही बातमी आणि पुरावे माजी पोलीस आयुक्त लेखी सादर करत असूनही तुम्ही गृहमंत्र्यांवर काय कारवाई करावी, याची अजून चर्चा करत आहात ? सत्तेची इतकी लालसा आहे की, आपण महाराष्ट्रसुद्धा विकायला सिद्ध झाला आहात ? असे प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून केले आहेत. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत पुण्यातील अलका चौकात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली २१ मार्च या दिवशी आंदोलन केले. या वेळी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपकडून राज्यातील विविध शहरांत आंदोलने करण्यात आली. तसेच, येत्या आठवड्याभरात राज्यभरात आणखी तीव्र आंदोलने करू आणि जोपर्यंत अनिल देशमुख राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी चेतावणी पाटील यांनी दिली.