पुणे, २१ मार्च – अधिकोषातील खातेदारांच्या गोपनीय माहितीच्या चोरी प्रकरणातून पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला ५ बँक खात्यांची महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली आहे. त्यातील एका खात्यात अनुमाने १०० कोटी रुपये पडून असल्याचे समोर आले आहे. अन्य ४ चालू खाती कॉर्पोरेटमधील आहेत. देशभरातील वेगवेगळ्या अधिकोषातील काही खात्यांची गोपनीय माहिती मिळवणे आणि त्यांची विक्री करून त्याद्वारे कोट्यावधी रुपये कमवणे असा कट नुकताच पुणे सायबर पोलिसांनी उघडकीला आणला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या सर्व आरोपींचे एकत्रितपणे तसेच स्वतंत्रपणे अन्वेषण करायचे असल्याने न्यायालयाने त्यातील ३ जणांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या संबंधी आर्थिक आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी संभाजीनगर, वापी, लातूर आणि पुण्यातील आरोपींच्या घरी धाडी टाकल्या आहेत.