जळगावच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन, तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील !

डावीकडून जयश्री महाजन, कुलभूषण पाटील

जळगाव – गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड गाजणार्‍या जळगाव महापालिकेच्या महापौरपदी सौ. जयश्री सुनील महाजन यांची, तर उपमहापौरपदी श्री. कुलभूषण पाटील यांची निवड करण्यात आली. शिवसेनेने ही लढाई ४५ विरुद्ध ३० अशा फरकाने जिंकली. भाजपला अतिशय भक्कम बहुमत असतांनाही त्यांच्या हातून सत्ता गेली आहे.

महापालिकेत भारतीय जनता पक्षाला असणारे भक्कम बहुमत पहाता महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोधी होण्याची शक्यता होती. पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनीही असाच दावा केला होता. पाच दिवसांपूर्वी भाजपमध्ये फूट पडण्याचे संकेत मिळताच शिवसेनेने असंतुष्ट भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील आणि इतरांच्या साहाय्याने भाजपला धक्का दिला.