विवाह कार्य, मोर्चे, निदर्शने आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांवरही ३१ मार्चपर्यंत बंदी
परभणी – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहर आणि जिल्ह्यातील काही भागांत प्रशासनाने १२ आणि १३ मार्च या दिवशी संचारबंदी लागू केली होती. पहिल्या दिवशी रस्त्यावर किरकोळ वाहतूक चालू होती. व्यापार्यांनी मात्र आपली दुकाने बंद ठेवत संचारबंदीला सहकार्य केले. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रस्ते निर्मनुष्य झाले होते.
१. १२ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून ते १५ मार्चच्या पहाटे ६ वाजेपर्यंत शहर महापालिकेच्या ५ किलोमीटर क्षेत्रात आणि जिल्ह्यातील अन्य ८ नगरपालिकांच्या ३ किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू होती.
२. शहर आणि जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अनेक धार्मिक स्थळे आणि शाळा बंद केल्या असून काही काळ विदर्भातील वाहतूकही बंद करण्यात आली होती.
३. विवाह कार्य, मोर्चे, निदर्शने आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांवरही ३१ मार्चपर्यंत बंदी आणण्यात आली आहे.
४. सर्व प्रकारची आस्थापने, कारखाने, दुकाने, व्यवसाय आणि खासगी कार्यालये बंद रहाणार आहेत; मात्र शासकीय कार्यालये आणि त्यांच्या वाहनांना सवलत देण्यात आली आहे. तसेच सरकारी, खासगी दवाखाने, औषध दुकाने, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, लसीकरण केंद्र आणि कोरोनाच्या चाचण्या करणारी केंद्रे चालू ठेवण्यात आली.
५. अत्यावश्यक सेवांचे परवाने घेतलेल्या व्यक्ती आणि वाहन यांना सवलत देण्यात आली आहे, तसेच माध्यम प्रतिनिधी आणि दैनिक यांच्या वितरकांनाही सवलत दिली.
६. पेट्रोल पंप, गॅस वितरक आणि दूध विक्रेते यांना सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली.
७. परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थी यांसाठी येणार्या बसगाड्या यांना या संचारबंदीतून वगळण्यात आले. राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून येणारी बस आणि रेल्वे वाहतूक चालू होती.