पोलिसांकडून बैलाच्या मालकावर गुन्हा नोंद
अशाच प्रकारची कारवाई अन्य गर्दीच्या ठिकाणीही होणे अपेक्षित आहे !
मुंबई – सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना डोंबिवली येथे एका बैलाचा वाढदिवस धुमधडाक्यात आणि फटाक्यांच्या जल्लोषात साजरा करण्यात आला. डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर रोड परिसरात हा प्रकार घडला. कोरोनाचे नियम पाळून, ‘मास्क’ लावून, सामाजिक अंतर ठेवून उत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने नेहमी करण्यात येत आहे. असे असतांना कोरोनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र कोविड कलम, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंध अधिनियमांतर्गत संबंधित बैलाच्या मालकावर विष्णुनगर पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.