१. साधना करण्यातील अडथळे
१ अ. पुण्य कमावणे किंवा भक्ती करणे सोपे नसून ती सुळावरची पोळी असणे अन् पुण्य प्राप्त केल्यावर देवाची शक्ती मिळणे : ‘पुण्य देवांपेक्षा भारी आहे. पुण्य कमावणे सोपे नाही. पुण्य कमवायला जाल, तेव्हा ते तुमचा जीव घेईल. इतके ते कठीण आणि महाग आहे. पुण्य कमवायला निखार्यांत हात घालावे लागतील, काट्यांतून चालावे लागेल आणि सतत संकटांना सामोरे जावे लागेल. भक्ती करणे सोपे नाही. ती सुळावरची पोळी आहे. भक्ती करतांना सुखाची राख-रांगोळी होते. चांगले भोग भोगायला मिळणार नाहीत. तेव्हाच पुण्याची पुंजी होते आणि मग देवाची प्राप्ती होऊन देवाची शक्ती मिळते. हे काम कठीण आहे; म्हणून कुणी भक्तीमार्गात उतरत नाहीत. सर्व लोक ‘खाया-पिया सुख पाया । उसने क्या रे कमाया । जैसा आया, वैसा गया ।’, असे वागतात आणि जन्माचे मातेरे करतात.’
२. परमार्थामध्ये ब्रह्मचर्य पालन करणे अतिशय महत्त्वाचे असणे
‘ज्या पुरुषाचे वीर्यपतन होत आहे आणि ज्या स्त्रीचे मासिक धर्म अन् भोग चालू आहेत, तोपर्यंत त्यांना ईश्वरी आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान होणार नाही. ज्याला आध्यात्मिक ज्ञान पाहिजे असेल, त्याने प्रथम वीर्य रोखून धरले पाहिजे; कारण परमार्थामध्ये ब्रह्मचर्य पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. ‘उशाला दह्याचे मडके (गाडगे) ठेवून उपवास कोण करील ?’, हा यक्ष प्रश्न आहे. स्त्री जवळ असतांना वीर्य रोखण्याचे अवघड कर्म कुणाला जमेल का ?’
३. साधना करणार्यांसाठी पू. (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे यांनी सांगितलेली अमृतवाणी
अ. आग लावणे सोपे; पण विझवणे कठीण आहे. हे ज्याला जमत नसेल, त्याने कळीची आग लावू नये.
आ. घरात गणपति आणून दारु आणि मांस खातात. याला काय म्हणावे ? हे मी स्वतः डोळ्यांनी पहात आहे. कितीही सांगितले, तरी ऐकत नाहीत. सकाळी कुणी अंघोळ करत नाही; म्हणून त्यांना ‘बजावणी’ दिली आहे, ‘येथे (प्रवचनाला) शिकायला यायचे, शिकवायला यायचे नाही.’
इ. कामाने रामाला पिटाळून लावले आहे.
ई. येथे देव, देश आणि धर्म शिकवला जातो. भक्ती आणि शिस्तीचे पालन करणार नसाल, तर येथे येऊ नका.
उ. पूजा आणि ध्यान करावे अन् सतत ईश्वराचे नाम मुखात असावे. देवासाठी सर्व सुख भोगायचे सोडले; म्हणून आचार-विचारांचे फवारे उडाले.
ऊ. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य मिळवा. ‘ईश्वरप्राप्ती करून मोक्षापर्यंत जावे’, यासाठीच देवाने मानवजन्म दिलेला आहे.
ए. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ।’ येथील मंदिर आणि परिसरात आल्यावर आपल्याला आनंदाची प्रचीती आली का ? जाणीव झाली का ?
ऐ. आधी तुम्ही देवासारखे वागा. मग तुम्हाला देव भेटेल.
ओ. ईश्वरी ज्ञान पाहिजे असेल, त्याने ‘रम, रमी आणि रमा’ सोडावी.
औ. पायाने माझ्या मंदिरात ये. हाताने टाळी वाजव. डोळ्यांनी मूर्ती पहा. कानाने माझ्या कथा ऐक. दात आहेत, तोपर्यंत खाऊन घे. डोळे आहेत, तोपर्यंत पाहून घे. शक्ती आहे, तोपर्यंत तीर्थयात्रेला जाऊन ये.’
४. साधनेसाठी मनाचा निश्चय हवा !
४ अ. ‘चांगल्या झाडाला सुकवणारी बांडगुळे म्हणजे भावबंद असतात. प्रथम त्याचा संबंध तोडून टाकला पाहिजे, तरच परमार्थ साधेल.’
४ आ. ईश्वराच्या कृपेविना माणूस संसाराच्या भयंकर जाळ्यातून बाहेर पडू शकणार नाही ! : ‘थोडी पूर्वपुण्याई असली, तरच मानव विचार जिंकून बाहेर येईल; कारण देवाकडे यायचे म्हणजे सर्व भोगांचे भयंकर जाळे तोडावे लागेल. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, इच्छा, वासना, मन, माया, कल्प आणि विकल्प जिंकून धावणारी खादोडी इंद्रिये जिंकावी लागतील. जितेंद्रिय व्हावे लागेल. हे मद आणि मोह यांचे भोग सोडायला कुणीच सिद्ध होणार नाही, हे परमेश्वराला ठाऊक होते; म्हणून तो मृत्यूद्वारे संसारापासून अलग करतो. हा नियतीचा खेळ अनादी काळापासून चालू आहे. येथे कुणी मृत्यूला थांबवू शकत नाही. दादा कितीही मोठा बलवान आणि धनवान असला, तरी एकना एक दिवस त्याला हे भरलेले जग सोडावेच लागेल.’
४ इ. रामाच्या कृपेने संसाराच्या चक्रव्यूहातून बाहेर पडता येते ! : ‘या संसाराच्या चक्रव्यूहातून जो बाहेर पडेल, त्याचे नाव वीर ! त्याला विराची पदवी दिली पाहिजे; कारण अनेक विकारांच्या जाळ्यात अडकलेल्या जिवाला त्रास आणि दुःख होते. त्यामुळे ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात; परंतु कुणी विशेष बाहेर पडत नाही. बाहेर पडायला कडकडीत वैराग्य लागते. माया आणि आपले मन यांचा चक्काचूर करावा लागतो. विकारांची खावखाव बंद करावी लागते. वैराग्य सोपे नाही. शिवधनुष्य कुणाला पेलवेल ? रामाची कृपा असेल, तरच शक्य होईल.’
– पूज्य (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
(पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)