अंबानींना ‘हेलिपॅड’ची अनुमती मिळण्यासाठी भाजपनेच स्फोटकांच्या वाहनाचे प्रकरण घडवून आणले  ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर ‘हेलिपॅड’ आहे; पण त्याच्या वापरास अनुमती मिळत नाही, तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानी यांच्या आस्थापनांचे भाग (शेअर्स) बाजारात घसरत असल्याने त्यांची मोठी आर्थिक हानी होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून ‘हेलिपॅडला’ ही अनुमती मिळावी, यासाठी भाजपनेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १० मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केला.

पटोले पुढे म्हणाले की, अंबानी यांच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेले वाहन सापडले. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार, तसेच त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था असतांना ते वाहन तेथेपर्यंत पोचलेच कसे ? वर्ष २००९ मध्ये अनिल अंबानी यांच्या ‘हेलिकॉप्टर’मध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात ज्याचे नाव समोर आले, त्याचा मृत्यू दुसर्‍याच दिवशी झाला होता.