हणजूण येथे नायजेरियन नागरिकाचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू

प्रारंभी हिंसक होऊन टॅक्सीचालक आणि उपाहारगृहाचे कर्मचारी यांना केली मारहाण

म्हापसा – हणजूण येथे नायजेरियन नागरिक मायकल झुबे (वय ३३ वर्षे) याचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मायकल झुबे प्रारंभी टुरिस्ट टॅक्सीतून प्रवास करत होता आणि प्रवास करतांना तो मध्येच हिंसक बनला. या वेळी त्याने टुरिस्ट टॅक्सीचालक आणि जवळच्या उपाहारगृहाचे (रॅस्टोरंट) कर्मचारी यांना मारहाण केली अन् टॅक्सीचीही तोडफोड केली. कळंगुट पोलिसांनी वर्ष २०१९ मध्ये मायकल झुबे याला ३६ ग्रॅम कोकेन बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले होते आणि त्याची चालू वर्षी २ फेब्रुवारी या दिवशी जामिनावर सुटका करण्यात आली होती.

मायकल झुबे ६ मार्चला पहाटे टुरिस्ट टॅक्सीतून प्रवास करतांना अचानक हिंसक झाल्याचे टॅक्सीचालकाच्या लक्षात आले. त्यामुळे टॅक्सीचालकाने भयभीत होऊन इतरांचे साहाय्य घ्यावे म्हणून पहाटे ५.३० वाजता वाहन हडफडे येथील उपाहारगृहाजवळ थांबवले. नायजेरियन नागरिक मायकल झुबे नियंत्रणाबाहेर गेल्याचे लक्षात आल्यावर उपाहारगृहाच्या कर्मचार्‍यांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आल्यावर नायजेरियन नागरिक मायकल झुबे आणखी हिंसक बनला आणि त्याने उपाहारगृहाचे कर्मचारी अन् उपाहारगृहाचा मालक, तसेच टॅक्सीचालक यांना मारहाण करण्यास प्रारंभ केला. मायकल झुबे याने टॅक्सीचीही तोडफोड केली. (एका नागरिकाला पोलीस आवरू शकत नाहीत आणि त्यांच्या उपस्थितीतच तो नशेबाज नागरिक टॅक्सीची आणि उपाहारगृहाची तोडफोड करतो, हे दुर्दैव ! – संपादक) यानंतर घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी हणजूण पोलीस ठाण्यात संपर्क साधून आणखी पोलीस कुमक मागवली. (एका नागरिकाला आवरण्यासाठी पोलीस कुमक का मागवावी लागते ? याचीही चौकशी झाली पाहिजे ! पोलिसांना आवश्यक प्रशिक्षण दिलेले नाही का ? – संपादक) यानंतर मायकल झुबे याला कह्यात घेण्यात आले आणि त्याला उपचारार्थ हणजूण येथील सेंट अँथनी रुग्णालयात भरती करण्यात आले. सकाळी ११.३० वाजता रुग्णालय व्यवस्थापनाने मायकल झुबे याचा मृत्यू झाल्याचे आणि यासाठी अमली पदार्थाचे अतीसेवन कारणीभूत असू शकते, असे पोलिसांना लेखी स्वरूपात कळवले. पोलिसांनी मायकल झुबे यांच्या विरोधात मारहाण करणे, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम ३२६, ५०४, ५०६ (२) अंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला, तसेच सी.आर्.पी.सी. अंतर्गत अनैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.