५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनाथी,  गोवा येथील सनातनच्या आश्रमातील चि. रुक्मिणी अविनाश जाधव (वय १ वर्ष) !

माघ कृष्ण पक्ष पंचमी (३.३.२०२१) या दिवशी चि. रुक्मिणी अविनाश जाधव हिचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. रुक्मिणीची आई सौ. स्वानंदी यांनी गर्भावर संस्कार होण्यासाठी केलेले विविध भावप्रयोग आणि अन्य अनुभूती आपण ४ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.  

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/456118.html

चि. रुक्मिणी जाधव

 

चि. रुक्मिणीला कडेवर घेतलेले सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

२. जन्म

बाळाच्या जन्मापूर्वी दत्ताला प्रदक्षिणा घालणे आणि ‘त्यामुळे बाळाचा जन्म गुरुवारी औदुंबर पंचमीला झाला’, असे वाटणे : ‘प्रसुतीपूर्वी सासरी घरी असतांना मी प्रतिदिन सायंकाळी व्यायाम म्हणून थोडे फिरायला जायचे. तेव्हा जवळच्या दत्तमंदिरात जाऊन मी दत्त महाराजांना ११ प्रदक्षिणा घालत असे. नंतर मी प्रसुतीसाठी माहेरी लासलगाव (निफाड, जि. नाशिक) येथे गेले. तेथील ग्रामीण रुग्णालयात माझी प्रसुती झाली. दत्ताला घालत असलेल्या प्रदक्षिणांचेच फळ म्हणून बाळाचा जन्म गुरुवारी औदुंबर पंचमीला झाला. मला मुलगी झाली. तिथेही मला चांगले आधुनिक वैद्य आणि साहाय्यक लाभले.

३. जन्म ते ३ मास

३ अ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘बाळ पुष्कळ चैतन्यमय आहे’, असे सांगणे

बाळाच्या जन्म झाला. तेव्हा श्री. अविनाश (पती) रामनाथीला होते. त्यांनी ही आनंदवार्ता श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितली. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘मी बाळाचे छायाचित्र बघितले नाही; परंतु मला बाळाची स्पंदने येथे जाणवत आहेत. बाळ पुष्कळ चैतन्यमय आहे.’’ त्यांचे हे शब्द ऐकून मला देवाप्रती अपार कृतज्ञता वाटली.

३ आ. देवाच्या कृपेने कोरोनामुळे दळणवळण बंदी चालू होण्यापूर्वीच प्रसुती होणे

फेब्रुवारी मासात माझी प्रसुती झाली. २२.३.२०२० या दिवसापासून घोषित करण्यात आलेल्या दळणवळण बंदीच्या रूपातील आपत्काळ चालू झाला. तेव्हा ‘देवाने अनेक संभाव्य अडचणींपासून मला आणि बाळाला वाचवून माझ्यावर पुष्कळ मोठी कृपाच केली’, असे मला जाणवले.

३ इ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘आता ‘बाळाला सांभाळणे’ हीच तुझी साधना आहे’, असे सांगणे

बाळ २१ दिवसांचे झाल्यावर एक दिवस श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा मला भ्रमणभाषवरून सत्संग लाभला. त्या वेळी त्यांनी ‘आता काही वर्षे ‘बाळाला सांभाळणे’ हीच तुझी साधना आहे. बाळाचे करतांना सर्व साधना म्हणून कर’, असे मला सांगितले. त्यांचे हे वाक्य सतत माझ्या मनात घोळत असायचे; पण तरीही त्यानंतर काही दिवस माझे साधनेचे काहीच प्रयत्न झाले नाहीत.

३ ई. बाळाच्या अंगावर वेगवेगळ्या रंगांचे दैवी कण दिसणे

बाळाच्या जन्मानंतर पुढे ७ – ८ मासांपर्यंत कधी प्रतिदिन किंवा एक दिवसाआड बाळाच्या विविध अवयवांवर वेगवेगळ्या रंगांचे दैवी कण दिसायचे. आमच्या अंथरुणावरही बर्‍याचदा दैवी कण दिसायचे. कधी कधी बाळाच्या अंगावर असंख्य दैवी कण असल्याने बाळाचे अंग त्या कणांमुळे चमकतांना दिसायचे.

३ उ. बाळाला तिसरा मास चालू झाल्यावर आपोआपच माझी व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांची तळमळ वाढू लागली.

३ ऊ. बाळाचे मर्दन करतांना केलेले भावजागृतीचे प्रयत्न ! 

१. बाल संत पू. भार्गवराम किंवा पू. वामन यांची सेवा करत आहे.

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मर्दन करत आहे.

३. परात्पर गुरुदेवांच्या चरणांना चंदनाचा लेप लावत आहे.

४. बाळाला पावडर लावतांना ‘परात्पर गुरुदेवांच्या चरणांची धूळ बाळाच्या सर्वांगावर लावत आहे’, असा भाव ठेवत असे.

३ ए. अनुभूती

१. बाळाला स्तनपान करतांना माझे मन निर्विचार होऊन माझा नामजप आपोआप होऊ लागायचा.

२. बाळाला झोपवतांना तिच्याकडे बघितल्यानंतर चैतन्य मिळत असल्याचे जाणवायचे आणि भावजागृतीही व्हायची.

४. वय ४ ते ८ मास

४ अ. बाळंतपणानंतर नाशिकहून सातार्‍याला सासरी जायचे ठरवत असतांनाच तेथील कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे समजणे आणि त्यामुळे सातार्‍याला न जाता रामनाथीला जायचे ठरणे

‘प्रसुतीनंतर काही दिवसांनी नाशिकहून रुक्मिणीला घेऊन सासरी सातार्‍याला जायचे आणि तिथे काही दिवस राहून मग स्थितीनुसार रामनाथीला यायचे’, असे आमचे नियोजन होते; परंतु बाळ सव्वा मासाचे झाल्यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे भारतभर दळणवळण बंदी घोषित झाली. त्यामुळे मला अजून अडीच मास माहेरीच रहावे लागले. रुक्मिणी ४ मासांची झाल्यावर सातार्‍याला जायचा विचार चालू असतांनाच तेथील स्थिती थोडी बिघडली. अकस्मात् गावात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘घरी सातार्‍याला न जाता थेट रामनाथीला जायचे’, असे आमचे ठरले.

४ आ. रामनाथी आश्रमात जायचे नियोजन करतांना अनेक अडचणी येणे आणि गुरूंच्या कृपेने त्या दूर होऊन रामनाथीला सुखरूप पोचता येणे

४ आ १. कोरोनाचा संसर्ग आणि दळणवळण बंदी यांमुळे न्यायला येणे यजमानांना शक्य नसणे, वाहन ठरवणे, ‘ई-पास’ काढणे इत्यादी गोष्टींचे नियोजन एकटीलाच करावे लागणे अन् त्यात पुष्कळ अडचणी येणे : कोरोनाच्या संसर्गामुळे असलेली दळणवळण बंदी आणि त्यामुळे निर्माण झालेला आपत्काळ यांमुळे अविनाश यांना रामनाथी येथून आम्हाला घ्यायला येणे अशक्य होते. घरी सासूबाई आणि सासरे दोघेच असल्याने त्यांनाही ‘ई-पास’ काढणे, वाहन बघणे, चालक ठरवणे किंवा इतर नियोजन करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या सर्व गोष्टींचे नियोजन मला एकटीलाच करायचे होते. त्यात अनेक अडचणीही येत होत्या. त्यामुळे माझ्या मनाला निराशा येत होती.

४ आ २. चार मासाच्या बाळाला रामनाथी येथे सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी ‘देवाने वसुदेव बनण्याची संधी दिली आहे’, असा विचार मनात येऊन निराशा आपोआप दूर होणे आणि शरणागतभाव निर्माण होणे : देवाने माझ्या मनात ‘४ मासाच्या बाळाला नाशिक येथून रामनाथीला सुरक्षित घेऊन जाणे, म्हणजे वसुदेवाप्रमाणे कंसाच्या कारावासातून भगवान श्रीकृष्णाला सुरक्षितपणे मथुरेला घेऊन जाण्यासारखे आहे’, असा विचार दिला. तेव्हा ‘देवाने मला वसुदेव बनण्याची संधी दिली आहे’, असा भाव माझ्या मनात निर्माण झाला. ‘मलाही रुक्मिणीला सुरक्षितपणे रामनाथीला घेऊन जायचे आहे’, असा विचार माझ्या मनात येऊन मनाची निराशा आपोआप दूर झाली आणि शरणागतभाव निर्माण झाला.

४ आ ३. ‘या प्रवासात आलेले अनेक अडथळे पार करत सुखरूप रामनाथीला पोचणे’, ही गुरुमाऊलीची अपार कृपाच ! : नाशिक ते रामनाथी हा १७ – १८ घंट्यांचा प्रवास आहे. दळणवळण बंदीतील प्रवासाच्या नियमांनुसार कुठेही थांबता येणार नव्हते. त्यामुळे वाहनचालक आणि वाहन दोन्ही अतिशय चांगले असणे आवश्यक होते. या सर्वांचे नियोजन करतांना अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अनेक अडथळे आले; परंतु श्रीकृष्णाला कंसाच्या बंदीवासातून मथुरेला नेतांना जसे कारावासाचे एकेक द्वार आपोआप उघडत गेले, तसे आम्ही रामनाथीला येतांना आलेल्या अनेक अडचणींची बंद द्वारे आपोआप गुरुमाऊलीच्या कृपेने उघडत गेली. ‘हे गुरुमाऊली, ‘हा प्रवास सुखरूप पार पडून आम्ही रामनाथीला पोचणे’, ही केवळ तुमचीच कृपा होती.

४ आ ४. नाशिकहून रामनाथीला येण्यापूर्वी आणि आल्यावर झालेले त्रास

४ आ ४ अ. नाशिकहून रामनाथीला येण्यापूर्वी २ दिवस पहाटे पडलेल्या स्वप्नात रुक्मिणी जखमी स्थितीत दिसणे आणि सकाळी प्रत्यक्षातही रुक्मिणीच्या कपाळावर रक्ताचे ओरखडे आलेले दिसणे : नाशिकहून रामनाथीला येण्यापूर्वी २ दिवस पहाटे मला स्वप्न पडले. त्यात मला पुढील दृश्य दिसले, ‘रुक्मिणी उकिरड्यासारख्या जागी पडलेली आहे, हिंस्र पशू ओरबडतात, तसे तिच्या अंगावर सगळीकडे ओरबडले आहे. ती अत्यंत जखमी स्थितीत आहे.’ या स्वप्नाने मी एकदम घाबरून उठले. त्यानंतर सकाळी ७ वाजता रुक्मिणीच्या कपाळावर रक्ताचे ताजे ओरखडे आलेले होते.

संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर २ दिवसांत ते हळूहळू न्यून झाले.

४ आ ४ आ. रामनाथीला आल्यावर अलगीकरणात असतांनाही रुक्मिणीचा तोंडवळा, डोके आणि छाती यांवर लाल रंगाचे ओरखडे आल्याचे ३ वेळा लक्षात आले. उपाय केल्यानंतर ते लगेच गेले.

४ आ ४ इ. चिनी सैनिकांनी ज्या दिवशी भारतीय सैनिकांवर आक्रमण केले होते, त्याच दिवशी च्या शरिरावर ओरखडे आणि कपाळावर रक्ताचा ओरखडा आला होता.

याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘बाळ सात्त्विक असल्यानेच तिच्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे होत आहेत.’’

(क्रमशः)

– सौ. स्वानंदी अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०२०)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• दैवी कण :  सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन  हे  घटक  असल्याचे  सिद्ध  झाले.  या  घटकांच्या  मूलद्रव्यांच्या  प्रमाणावरून शोधलेले  त्यांचे  ‘फॉर्म्युले’  सध्या  अस्तित्वात  असलेल्या  कोणत्याही  कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग ४ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/456574.html