
नवी मुंबई – भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. अनेक धर्म, प्रांत, भाषा, संस्कृती, इतिहास, समाजजीवन या गोष्टी कितीही वेगवेगळ्या असल्या, तरी त्या कलहाचा विषय न ठरता, विविधतेतील एकता जपत आपण सर्व भारतीय म्हणून देशाला बलवान करूया आणि प्रगती साधूया, असे आवाहन राज्याच्या माहिती अन् जनसंपर्क विभागाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ यांनी येथे केले. ते ‘रोटरी इंटरनॅशनल संस्थे’च्या रोटरी क्लब, नवी मुंबई सी साईडच्या वतीने देण्यात आलेल्या ‘व्यावसायिक नैपुण्य पुरस्कार’ प्राप्त केल्यानंतर सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.
भुजबळ पुढे म्हणाले की, भारतातील भाषावैविध्य पाहून भारत सरकारने ‘त्रिसूत्री भाषा धोरण’ स्वीकारले आहे. त्यामुळे तसेच ज्या भागात आपण रहातो, त्या भागातील स्थानिक भाषा आत्मसात केल्यास त्या भागाचा इतिहास, भूगोल, साहित्य, संस्कृती, समाजमन आपण अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. त्यामुळे आपण आपल्या नोकरी, व्यवसायांतसुद्धा अधिक प्रगती करू शकतो, ही गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्रात रहाणार्या सर्वांनी मराठी भाषा आत्मसात केली पाहिजे. सोबतच राष्ट्रीय स्तरावरील भाषा म्हणून हिंदी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषा म्हणून इंग्रजीसुद्धा आत्मसात केल्यास भाषेमुळे होणारे वादविवाद न होता शांततेच्या मार्गाने सर्वच प्रगती साधू शकतील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना माजी मुंबई डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बन्सी धुरंधर यांनी ‘व्यक्तींना प्रगती साधायची असेल, तर त्यांनी स्वत:ची दृष्टी विशाल करण्याची आवश्यकता आहे’, असे सांगून रोटरीची ध्येयधोरणे विषद केली.
या वेळी दृष्टीबाधित मुलांसाठी कार्य करणार्या नेहा खरे, नृत्यांगना डॉ. शर्मिष्ठा चटोपाध्याय, फुटबॉल खेळाडू कु. अनन्या तेरडाळें, डिजिटल तज्ञ राजीव राणा, चित्रकार सुरेश नायर, युवा टेनिस खेळाडू ऋषिकेश माने, भटक्या जनावरांच्या सुरक्षेसाठी कार्य करणारे डेटा अभियंता अक्षय रिदलान, बाल टेनिस खेळाडू आरव छल्लानी, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील वंचित घटकांसाठीच्या आरोग्य सेवा कार्याबद्दल सुनीलकुमार प्रभाकरन यांनाही ‘व्यावसायिक नैपुण्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.