अक्षय शिंदे चकमक प्रकरणी ५ पोलिसांवर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा आदेश

अक्षय शिंदे

मुंबई – बदलापूर बलात्काराच्या प्रकरणात पोलीस चकमकीत ठार झालेला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ५ पोलिसांवर गुन्हा नोंदवण्याचा, तसेच या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ‘विशेष अन्वेषण पथक’ स्थापन करण्याचा आदेश राज्यशासनाला दिला आहे. ७ एप्रिल या दिवशी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. या प्रकरणात पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यात न आल्यामुळे न्यायालयाने राज्यशासनावर ताशेरे ओढले.

या प्रकरणात कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणी दंडाधिकार्‍यांनी चौकशी अहवालामध्ये ५ पोलिसांना उत्तरदायी ठरवले होते. या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी राज्यशासनाने केली होती; मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली. दंडाधिकार्‍यांनी या प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजित मोरे आणि हरिश तावडे, तसेच पोलीस वाहनचालक सतीश खाटळ यांना उत्तरदायी ठरवले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यशासनाने सहपोलीस आयुक्त लख्मी गौतम यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथक नियुक्त केले आहे. या प्रकरणाविषयीची सर्व कागदपत्रे विशेष पोलीस पथकाकडे सोपवण्याचा आदेश या वेळी न्यायालयाने दिला. अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी या प्रकरणाचा खटला चालवायचा नसल्याचे न्यायालयाला कळवले आहे; परंतु न्यायालयाने ‘हा खटला चालवणार’, असे म्हटले आहे, तसेच ‘हे प्रकरण बंद करणे, आमच्यासाठी सोपे होते; परंतु घटनात्मक न्यायालय म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही किंवा दुर्लक्ष करू शकत नाही.’

संपादकीय भूमिका

पोलिसांवर गुन्हा नोंदवण्याचा आदेश उच्च न्यायालयाला द्यावा लागतो, हे प्रशासनाला लज्जास्पद !