|
वेंगुर्ला – तालुक्यातील मिठागरवाडी, शिरोडा येथे बांधलेल्या संरक्षक बंधार्याला ३ मार्च या दिवशी भगदाड पडल्याने येथील मिठागरात समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसल्याने मोठी हानी झाली होती. या घटनेनंतर तब्बल एक महिन्यानंतर, म्हणजे ५ एप्रिलला या बंधार्याची दुरुस्ती करून भगदाड बुजवण्यात आले. या कालावधीत मिठागरांचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाल्याने मोठी हानी झाली आहे. बंधार्याचे हे भगदाड बुजवले गेले नसते, तर पावसाळ्यात खाडीचे पाणी घुसून ८ ते १० मिठागरे आणि शेकडो एकर शेती कायमची नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला असता.
खारभूमी विकास विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे पाहून येथील मीठ उत्पादक विठ्ठल (दादा) गावडे, देवेश गावडे, शेतकरी तुषार राऊत, खारभूमी संस्थेचे सचिव संदीप गावडे यांनी खारभूमी विकास उपविभागाच्या अधिकारी सौ. स्नेहल माईणकर यांची भेट घेऊन त्यांना वस्तूस्थिती लक्षात आणून दिली. त्यानंतर सौ. माईणकर यांनी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून ठेकेदाराच्या माध्यमातून बंधार्याचे भगदाड बुजवण्याचे काम करवून घेतले. यासाठी खारभूमी विभागाचे कनिष्ठ अभियंता भालचंद्र परब, रोहन जुवेकर आणि ठेकेदार प्रकाश भेंगाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे काम होण्यासाठी शिरोडा गावच्या सरपंच सौ. लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर, तसेच माजी सदस्य लक्ष्मण (आबा) राऊत यांनी विशेष लक्ष घातले होते.
सॉल्ट डिपार्टमेंटचे पूर्णतः दुर्लक्ष
वर्ष १९३० मध्ये मिठाचा सत्याग्रह शिरोडा येथे झाला होता. तो ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणापासून जवळच हे भगदाड पडले होते. या ऐतिहासिक ठिकाणालाही झळ पोचण्याची शक्यता होती, तसेच बंधारा फुटल्याने खाडीचे पाणी घुसून मिठागरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा वेळी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मिठागरांशी संबंधित ‘सॉल्ट डिपार्टमेंट’ने या घटनेची नोंद घेणे अपेक्षित होते; मात्र शेतकर्यांनी विनंती करूनही संबंधित अधिकार्याने गेला महिनाभर कोणतेही पाऊल उचलले नाही, असा आरोप करत येथील शेतकर्यांनी या विभागाच्या कार्यपद्धतीविषयी अप्रसन्नता व्यक्त केली.