विश्वकल्याणकारी रामराज्याचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रतिदिन एक घंटा द्या! – हिंदु जनजागृती समिती

वाराणसी व्यापार मंडळ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्रीरामनवमीनिमित्त ‘हिंदु एकता मिरवणूक’ !

श्रीराम

वाराणसी – विश्वकल्याणकारी रामराज्याचे ध्येय साध्य करण्यासाठी हिंदु समाजात जागृती आणि संघटन आवश्यक आहे. या उद्देशाने श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर वाराणसी व्यापार मंडळ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भव्य ‘हिंदु एकता मिरवणूक’ काढण्यात आली.

या मिरवणुकीत अनेक हिंदु संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, व्यापार मंडळाचे प्रतिनिधी आणि भगवान श्रीरामाचे अनेक भक्त सहभागी झाले होते. या वेळी सर्वांनी भगवान श्रीरामाच्या चरणी ‘विश्वकल्याणासाठी भारतात रामराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन व्हावे’, अशी प्रार्थना केली आणि रामराज्याचे ध्येय साध्य करण्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञा केली.

धर्मध्वजाचे पूजन आणि शंखनाद करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. या वेळी ‘एक नारा, एक नाव, जय श्रीराम जय श्रीराम’, ‘पवनपुत्र हनुमानाचा विजय असो’, अशा घोषणा देण्यात आल्या. समाजातील अनेक भाविक मोठ्या उत्साहात यात्रेत सहभागी होत होते आणि श्रीरामाच्या प्रतिमेवर फुले उधळत होते. ही मिरवणूक मैदागीन चौकातून चालू झाली आणि नीचीबाग, चौक, बसफाटक, दशाश्वमेध चौक असे करत चित्तरंजन पार्क येथे संपली.