
कोल्हापूर, ७ एप्रिल (वार्ता.) – श्रीरामनवमीच्या निमित्ताने सकल हिंदु समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून काढलेली मिरवणूक ही हिंदुत्व जागृत करणारी होती. यामध्ये हिंदुत्वनिष्ठ कोल्हापूर, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढलेला फलक, कसायास वयाच्या १४ व्या वर्षी छत्रपतींनी केलेली शिक्षा, महाराणी ताराराणी, वक्फ विधेयकाच्या संदर्भात प्रबोधन यांसह अन्य फलकांचा समावेश होता. ही मिरवणूक बिंदू चौक, मिरजकर तिकटीमार्गे पापाची तिकटी येथे समाप्त झाली.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे आणि श्री. उदय भोसले, ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. संभाजी (बंडा) साळुंखे, श्री. अनिल चोरगे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, आरोग्य भारतीच्या वैद्या अश्विनी माळकर, हिंदु महासभेच्या महिला आघाडीच्या शीला माने, रश्मी साळोखे यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज यांचा जिवंत देखावा !

हिंदु एकता संघटनेच्या वतीने मिरजकर तिकटी येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात सिंहासनारूढ प्रभु श्रीरामांची मूर्ती, उंट, घोडे, धनगरी ढोल यांचा समावेश होता. या प्रसंगी हिंदु एकताचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई यांसह अन्य उपस्थित होते. या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज यांचा जिवंत देखावा करण्यात आला होता. या देखाव्यात छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कैद केल्यावर त्यांचा कशा प्रकारे अन्वनित छळ करण्यात आला आणि त्यांना हिंदु धर्मासाठी कशा प्रकारे बलीदान दिले, हे दाखवण्यात आले.