मडगाव येथे अंदाजे ५४० किलो मावा कह्यात

अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

मडगाव, ७ एप्रिल (वार्ता.) – इयत्ता १० वीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मिठाई बनवण्यासाठी मडगाव येथे आणण्यात आलेला १ लाख ८९ सहस्र रुपये किमतीचा तब्बल ५४० किलो मावा (खवा) अन्न आणि औषध प्रशासनाने कह्यात घेतला आहे. निर्धारित मानकांनुसार हा मावा साठवण्यात आला नव्हता. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून याची नंतर विल्हेवाट लावण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासनातील दक्षिण गोव्याचे अधिकारी संज्योत कुडाळकर यांनी ही माहिती दिली.

संज्योत कुडाळकर म्हणाले, ‘‘हा मावा बनवल्याची आणि त्याच्या वापराच्या समयमर्यादेची माहिती माव्याच्या वेष्टनावर नाही. तसेच दुधापासून बनवलेले असे पदार्थ साठवण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात आलेले आहेत: मात्र याचेही या ठिकाणी पालन केलेले नव्हते. संबंधित आस्थापनांच्या कर्मचार्‍यांना आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊनही त्यांनी योग्य काळजी घेतलेली नाही.’’