ठाणे जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव उत्साहात पार पडला !


ठाणे, ७ एप्रिल (वार्ता.)
– ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी येथे रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील गृहसंकुले, चौकाचौकांत श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहरांतील श्रीरामांच्या मंदिरात दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, अंबरनाथ आणि अन्य ग्रामीण भागांत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मिरवणुका काढण्यात आल्या. यात मोठ्याने श्रीरामनामाचा जयघोष करत, पारंपरिक वेश परिधान करून, हातात भगवे ध्वज घेऊन धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते. शहरातील रिक्शा आणि दुचाकी यांवर तरुणांनी श्रीरामाचे चित्र असलेले ध्वज लावले होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.