चैत्री यात्रेसाठी ६ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी

चैत्री एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत् रोषणाई !

चैत्री यात्रेसाठी मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई

पंढरपूर – चैत्री यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, संत तुकाराम भवन आणि संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे. श्रींच्या गाभार्‍यावरील कळसास रोषणाई करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

लवकरच वारकरी-भाविकांसाठी थंड पाण्याची सोय ! – मनोज श्रोत्री

मनोज श्रोत्री

ज्या भागातून वारकरी-भाविक दर्शनासाठी येतात, त्या दर्शन रांगेत वरती थंड पाण्याच्या वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. त्यांना ५-६ ठिकाणी नळ बसवून भाविकांना पिण्यासाठी थंड पाण्याची सोय करण्यात येणार आहे, तसेच अन्यत्रही दर्शनरांगेत मंदिरे समितीच्या वतीने थंड पाण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक श्री. मनोज श्रोत्री यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली.

पंढरपूर – चैत्री यात्रेसाठी प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने ६ लाख बुंदी लाडू प्रसाद आणि ६० सहस्र राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत आहे. ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत घालून प्रतिपाकीट २० रुपये प्रमाणे आणि २५ ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रतिपाकीट १० रुपये प्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’चे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

चैत्री यात्रेसाठी बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती करतांना सेवक

बुंदी लाडू प्रसाद ‘एम्.टी.डी.सी.’ भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा, ‘डबल रिफाइंड’ तेल, काजू, बेदाणा, वेलची इत्यादी पदार्थांपासून, तसेच अन्न आणि औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सिद्ध करण्यात येत आहे. या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत पडताळणी करून घेण्यात आली आहे.