भारतमातेला हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निर्धार करा ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथील ‘ऑनलाईन शौर्यजागृती’ व्याख्यानाला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर, ३ मार्च (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह, राजगुरु यांचे नाव घेतल्यावर आपल्या मनात निर्माण होते ते खरे ‘शौर्य’ ! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमी इतिहास आपल्याला शिकवला जात नसल्याने खरे शौर्य काय असते, हे आताच्या पिढीला समजत नाही. इतिहासामध्ये अनेक क्रांतीकारकांची नावेही वगळण्यात आली आहेत. हे क्रांतीकारक त्यांच्या युवावस्थेत भारत देशासाठी लढले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन हिंदूंनी संघटित होऊन भारतमातेला हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निर्धार करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटन श्री. सुमित सागवेकर यांनी केले.

हिंदु युवती आणि युवक यांसाठी २८ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन शौर्यजागृती’ व्याख्यानात ते बोलत होते. व्याख्यानाचा उद्देश समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी सांगितला. यात हिंदु युवक आणि युवती ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहभागी झाले होते. समारोप प्रसंगी अनेक युवक आणि युवती यांनी आपले मनोगत उत्स्फूर्तपणे व्यक्त केले.

श्री. सुमित सागवेकर

अभिप्राय

ऊमाहेश्‍वरी निंबाळकर – प्रत्येक कुटुंबामध्ये स्वरक्षण प्रशिक्षण शिकवायला हवे. या व्याख्यानातून पुष्कळ प्रेरणा मिळाली. माझ्या मैत्रिणींनाही हा विषय सांगून स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यास सांगीन.

पवार – कलियुगात लोक वाईट गोष्टींकडे लवकर आकर्षित होतात; मात्र हा उपक्रम चांगला आहे. या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा.

गायकवाड – व्याख्यान ऐकून मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. समाधान वाटले.


क्रांतीकारकांकडून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान द्या ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

सांगली येथील ‘ऑनलाईन शौर्यजागृती’ व्याख्यानाला १५० हिंदू युवक आणि युवती यांचा उत्स्फूर्त सहभाग

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सांगली, ३ मार्च (वार्ता.) – क्रांतीकारकांनी ज्याप्रमाणे भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले, त्याप्रमाणे हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी योगदान देणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती येण्यासाठी साधनेला प्रारंभ करा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. सांगली येथील युवक आणि युवती यांच्यासाठी नुकत्याच झालेल्या ‘ऑनलाईन शौर्यजागृती’ व्याख्यानात त्या बोलत होत्या. या व्याख्यानात १५० हिंदु युवक आणि युवती ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहभागी झाले होते. या व्याख्यानात उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या वेळी ‘स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचा उद्देश हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी सांगितला, तर सूत्रसंचालन श्री. मिनेश पुजारे यांनी केले.

अभिप्राय

ए. आर. बिराजदार – स्वरक्षण प्रशिक्षण घेतल्यामुळे अनेक संकटातून आमचे रक्षण होणार आहे. त्यामुळे या कार्यात मी सहभागी होईन.

चारुशीला काळे – व्याख्यान ऐकून मनामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. या उपक्रमामध्ये अनेक जणांना सहभागी करून घेण्याचा मी प्रयत्न करीन.

जयश्री  – व्याख्यानातून युवती आणि महिला यांना प्रेरणा मिळाली.

श्रद्धा वाळवेकर – व्याख्यानाद्वारे युवक-युवती यांना दिशा मिळाली. उपक्रमामुळे युवतींच्या समस्या दूर होतील.

मानसी खैरे – माझ्याकडे येणार्‍या महिलांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास सांगीन.