मुंबईत मागील वर्षी वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात !

  • अमेरिकेतील आस्थापनाचा दावा !

  •  गलवान खोर्‍यातील संघर्षाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न  !

  • चीन वेगवेगळ्या माध्यमांद्वारे भारतावर आघात करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अशा आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यास भारत सिद्ध आहे का ?
  • भारत सरकारने अमेरिकेच्या वृत्तपत्राने केलेला हा दावा खरा कि खोटा, हे पडताळून त्यामागील सत्य समोर आणणे आवश्यक !
  • भारताच्या आर्थिक राजधानीत काही वेळ पूर्णपणे वीज खंडित होणे आणि आपत्कालीन स्थिती निर्माण होणे यांसारख्या गंभीर गोष्टीत शत्रूराष्ट्राचा हात असल्याचे अमेरिकेतील दैनिकात प्रथम प्रसिद्ध होते; तेव्हा इथे चर्चा होते ! भारतातील यंत्रणा आणि शासन ते तत्परतेने जनतेला प्रथम का सांगत नाही ?
  • वीज बंद पाडण्याचा घातपात, कृत्रिम हिमनग सिद्ध करून नदीला पूर आणणे आदी गोष्टी चीन करत असल्याची चर्चा आहे. हे जर सत्य असेल, तर चीनची मजल आता पुढच्या टप्प्यात अधिक गंभीर रूप धारण करू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे आणि त्याला कायमचा धडा शिकवला पाहिजे, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीनच्या हॅकर्स सैन्याने ऑक्टोबर २०२०मध्ये केवळ ५ दिवसांच्या कालावधीत भारतात पॉवर ग्रीड, आयटी आस्थापने आणि बँकिंग सेक्टर्स यांवर ४० सहस्र ५०० वेळा आक्रमण केले. १२ ऑक्टोबरला मुंबईत झालेल्या ‘ब्लॅक आऊट’ (वीजपुरवठा खंडित होणे) मागेही चीनचा हात होता, असे वृत्त अमेरिकेतील वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने अमेरिकेचे सायबर संरक्षण आस्थापन ‘रिकॉर्डेड फ्युचर’च्या अभ्यासाचा हवाला देऊन दिले आहे. ‘रिकॉर्डेड फ्युचर’ हे आस्थापन सरकारी यंत्रणेसमवेत मिळून इंटरनेटसंबंधी अभ्यास करते. असे असले, तरी हे आस्थापन भारताच्या पॉवर सिस्टममध्ये पोचू शकत नव्हते. त्यामुळे याचे पुढील अन्वेषण करू शकले नाही. गलवान खोर्‍यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये  झालेल्या झटापटीनंतर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. ‘जर भारताने अधिक कठोरपणा दाखवला, तर संपूर्ण देशाला पॉवर कटचा सामना करावा लागेल’, असा या आक्रमणामागील संदेश होता, असा दावा यात करण्यात आला आहे. चीन हॅकर्सच्या साहाय्याने भारतात ‘ब्लॅकआऊट’ करण्याच्या सिद्धतेत होता.

१. या अभ्यासात सांगण्यात आले आहे की, चीन दाखवू पहात होता की, सीमेवर त्याच्या विरोधात कारवाई केली, तर तो भारतातील वेगवेगळ्या पॉवर ग्रीडवर सायबर आक्रमण करून करून त्यांना बंद करू शकतो. चिनी हॅकर्सने पसरवलेला मालवेयर (व्हायरस) भारतातील वीजपुरवठा नियंत्रित करणार्‍या प्रणालीमध्ये घुसला होता. यामध्ये हाय वोल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन आणि थर्मल प्लांट यांचाही समावेश होता. भारतात वीजपुरवठा करणार्‍या लाईनमध्ये चीनच्या व्हायरसने घुसखोरी केली होती.

२. या आस्थापनाचे प्रमुख ऑपरेटिंग ऑफिसर स्टुअर्ट सोलोमन यांनी सांगितले की, चीनच्या सरकारी यंत्रणेच्या ‘रेड इको’ नावाच्या एका आस्थापनाने भारताच्या अनेक पॉवर जनरेशन आणि ट्रान्समिशन लाईन यांमध्ये घुसखोरी केली होती. यासाठी सायबर हॅकिंग तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आला होता. याच वेळी मुंबईतील पॉवर ग्रीडचा वीजपुरवठा खंडित झाला होता; पण यामागे सायबर आक्रमण आहे कि दुसरे काही हे सिद्ध करता आले नाही.

नितीन राऊत

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा घातपाताच्या शक्यतेला दुजोरा

मुंबई – राज्य सरकारने त्याच वेळी घातपाताचा संशय व्यक्त केला होता; पण तेव्हा मला वेड्यात काढण्यात आले. असे असले तरी काहीतरी गडबड आहे, ही शंका आम्हाला आली होती. त्यामुळे आम्ही तात्काळ ऊर्जा विभागाची चौकशी समिती स्थापन केली होती. राज्य वीज नियामक आयोग (एम्.इ.आर्.सी.) आणि केंद्रीय वीज प्राधिकरण यांनीही समिती स्थापन केली होती. सायबर सेललाही तक्रार करण्यात आली होती. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आज तो अहवाल ऊर्जा विभागाला देणार असून त्याविषयी सविस्तर निवेदनही केले जाईल, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.

३. मुंबईत १२ ऑक्टोबर २०२० मध्ये सकाळी वीजपुरवठा अचानक खंडित झाला होता. यामुळे मुंबई ठप्प झाली होती. वीज गेल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयांतील वेंटिलेटर्संनी काम करणे बंद केले होते. २ घंट्यांच्या प्रयत्नानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरळीत होऊ शकला होता.