Maharashtra Railway Projects : मेट्रो, मोनो, लोकल रेल्वे आणि बेस्ट यांच्यासाठी एकच तिकीट !

  • केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची घोषणा

  • ‘मुंबई १’ कार्ड एका मासात कार्यरत होणार !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव

मुंबई – मेट्रो, मोनो, लोकल रेल्वे आणि बेस्ट यांसाठी ‘मुंबई १’ हे कार्ड चालणार आहे. येत्या एक मासात हे कार्ड चालू केले जाईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी ११ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले. बुलेट ट्रेन आणि रेल्वेस्थानक यांची दुरुस्ती आदी कामे मिळून महाराष्ट्रात एकूण १ लाख ७३ सहस्र ८०४ कोटी रुपये इतकी गुंतवणूक केंद्रीय रेल्वेद्वारे केली जाणार आहे, अशी माहितीही वैष्णव यांनी दिली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

श्री. अश्विनी वैष्णव म्हणाले

१. चालू वर्षात केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी २३ सहस्र ७७८ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. यांमध्ये मुंबईसाठी १७ सहस्र कोटी रुपयांचा समावेश आहे. मुंबईमध्ये २३८ वातानुकूलित नवीन गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे.

२. सद्य:स्थितीत मध्य आणि पश्चिम मार्गांवरून मुंबईतून दिवसभरात ३ सहस्र ५०० रेल्वेच्या फेर्‍या होतात. या गाड्यांतून नियमित ८० लाख लोक प्रवास करतात. प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचे काम चालू आहे.

३. बोरीवली-विरार ६ मार्गिका, विरार-डहाणू ३-४ मार्गिका, कल्याण-आसनगाव ४ मार्गिका अशा प्रकारे मार्गिकांची संख्या वाढवण्यात येत आहे. काही मार्गिकांसाठी भूसंपादनाचे काम चालू आहे.

४. या मार्गिकांमुळे ८५ लाख अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. मुंबईमध्ये सध्या २ रेल्वेगाड्यांमधील गाडी सुटण्याचा कालावधी १.८० सेकंद इतका आहे. हा कालावधी ३० टक्क्यांनी अल्प करण्यात येणार आहे. यामुळे लोकल रेल्वे ३० टक्क्यांनी अधिक कार्यक्षम होऊ शकेल.

५. रेल्वेचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी रेल्वेगाडीच्या रचनेत पालट करण्यात येत आहे. यामध्ये रेल्वेचा दरवाजा बंद होण्याची प्रक्रिया, रेल्वे डब्यामध्ये प्राणवायू खेळता रहाण्याची व्यवस्था अशा प्रकारे नवीन ट्रेनची रचना असेल.

६. पावसाळ्यामध्ये रेल्वेमार्गावरील पाण्यामुळे गाड्यांचा खोळंबा होणार नाही, अशी व्यवस्थाही केली जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन चालू होणार ! – मुख्यमंत्री

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन चालू होणार असून त्यात सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे चालू होईल. या द्वारे १० दिवसांचा दौरा केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडदुर्ग, जागा आणि त्यांच्याशी संबंधित इतर सांस्कृतिक स्थळांना ही रेल्वे जोडली जाणार आहे.’’