इचलकरंजीत पंचगंगेचे पात्र जलपर्णीने व्यापले

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – येथील पंचगगा नदीपात्र जलपर्णीने व्यापले आहे. नदीघाट परिसरातही जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचली आहे. त्याचा धोका जलचरांना निर्माण झाला आहे. अनेक दिवसांपासून पंचगंगा नदीतील पाणीप्रवाह थांबला होता. त्यामुळे पाण्यात शेवाळाचे प्रमाण वाढले होते. परिणामी पाण्याला हिरवट रंग आला होता, तसेच पाण्याची पातळी अल्प झाल्यामुळे इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पंचगंगा योजनेचा एक उपसा पंप बंद पडला होता.

या पार्श्वभूमीवर पालिकेने पंचगंगा नदी प्रवाहित करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार ३ दिवसांपूर्वी धरणातून पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडले आहे. या पाण्याच्या प्रवाहासमवेत जलपर्णी वहात आली आहे. ही सर्व जलपर्णी पंचगंगा बंधारा आणि नदीघाट परिसरात साचून राहिली आहे. यापूर्वी जेसीबीच्या साहाय्याने अनेक वेळा पालिकेसह सामाजिक संस्थांनी जलपर्णी हटवली होती. आता पुन्हा एकदा जलपर्णीचे संकट आले आहे. सध्या नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. पाण्याच्या प्रवाहासमवेत ही जलपर्णी पुढे वहात न गेल्यास जलचरांना धोका होण्याची शक्यता आहे.