अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर स्फोटके भरलेली गाडी सापडली !

मुंबई – भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज्चे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या इमारतीबाहेर २५ फेब्रुवारी या दिवशी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ जीप दुपारी आढळली. या गाडीत आढलेल्या २० ते २५ ‘जिलेटिन’च्या कांड्या पोलिसांनी जप्त केल्या. संशय आल्यामुळे गाडीची पडताळणी झाली. या गाडीत चिठ्ठी सापडली आहे. ‘‘ही चेतावणी समजा. आम्ही स्फोटही घडवू शकतो. तुम्ही सुरक्षित नाही.’’

मुंबई पोलीस आणि श्‍वानपथक घटनास्थळी पोचले आणि त्यांनी त्यांच्या साहाय्याने ही जिलेटिनची गाडी शोधण्यात आली. बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक लॅबची टीम येथे आली होती. बाँबशोधक पथकाने या काड्यांचा ‘कनेक्टर’ कुठे नाही ना, हा भाग प्रथम पडताळला. मध्यरात्री १ वाजता ही गाडी या इमारतीच्या बाहेर ही गाडी उभी केल्याचे सीसीटीव्ही चित्रणातून कळले. या गाडीत विविध गाडीच्या क्रमांकाच्या पाट्याही होत्या. येथे दोन गाड्या आल्या. ही गाडी उभी करून दुसर्‍या गाडीतून ती उभी करणारे निघून गेले, असे सीसीटीव्हीत दिसले.


हा अत्यंत उच्चभ्रू परिसर असून येथे उद्योगपती, राजकारणी, मंत्र्यांचे बंगले, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली अशी ठिकाणे आहेत.

आवश्यकता पडल्यास अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवू ! – शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री

शंभूराज देसाई

या वाहनाचा रंग घालवलेला आहे. हे वाहन कह्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडून अन्वेषण चालू आहे. स्फोटके का ठेवली ? याच्या मुळाशी आम्ही जाऊच. आवश्यकता पडली, तर अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवली जाईल.