पुणे जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

पुणे – पुणे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत नियंत्रित संचार राहील, याची कार्यवाही करा. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी २०० व्यक्तींच्या मर्यादेत लग्न समारंभ होतील, याची दक्षता घ्या, असे निर्देश देऊन कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून या नियमांची कडक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी दिले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत कोरोना परिस्थिती उपाययोजनांविषयी आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी पुढील आदेश दिले. कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा. शहर आणि ग्रामीण भागात ‘हॉटस्पॉट’निहाय अधिकार्‍यांना दायित्व द्या. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. संपर्क शोध मोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा. शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करून नमुना तपासण्या वाढवा. आरोग्य कर्मचार्‍यांच्या वतीने गृहभेटीद्वारे ‘सुपर स्प्रेडर’ आणि ‘सारी’ रुग्णांचे सर्वेक्षण करा. हॉटेल, बार रात्री ११ पर्यंतच चालू रहातील याची दक्षता घ्या. रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान नियंत्रित संचाराची कार्यवाही करा. वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे या अत्यावश्यक सेवांना सवलत द्या. जिल्ह्यात सर्वत्र कोविड केअर सेंटर तात्काळ चालू करा. मास्क न वापरणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा.

कोल्हापुरात विनामास्क फिरणारे पर्यटक आणि नागरिक यांच्यावर कारवाई

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात विनामास्क फिरणारे पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्यावर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. २१ फेब्रुवारी या दिवशी शहरात येणार्‍या पर्यटकांवर भवानी मंडप येथे कारवाई करण्यात आली, तसेच त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. या वेळी काही पर्यटकांनी महिला कर्मचार्‍यांशी हुज्जत घातली; मात्र महिला कर्मचार्‍यांनी उद्धट वागणार्‍या पर्यटकांना खडेबोल सुनावले.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतरही विवाह समारंभात ५० पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याचे चित्र आहे, तर महाद्वार रस्ता, लक्ष्मीपुरी, भाजीपाला मार्केटमध्ये अनेक विक्रेते आणि ग्राहक यांच्या तोंडावर ‘मास्क’ न लावता वावरत असल्याचे दिसत आहे.

पुसेगाव (जिल्हा सातारा) येथील शाळेत ६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण !

सातारा – पुसेगाव (जिल्हा सातारा) येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील ६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शाळेतील ६ विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. इतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून शाळा बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात ३ आठवड्यांत १ सहस्र १८३ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले, तर ३० जणांचा बळी गेला आहे. बाधितांचा ‘पॉझिटिव्ह रेट’ ३ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर जाऊन पोचला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ५८ सहस्रांच्या घरात पोचली आहे.

सातारा शहरात विना‘मास्क’ फिरणार्‍यांवर कारवाई

सातारा, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विना‘मास्क’ फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एक पथक सिद्ध करण्यात आले असून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी १९ फेब्रुवारीपासून कारवाईस प्रारंभ केला आहे. १९ फेब्रुवारी या एकाच दिवशी १५० जणांवर कारवाई करत ७५ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला. तसेच शहरातील नागरिक, व्यापारी, दुकानदार यांना प्रत्यक्ष भेटीद्वारे ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’, सामाजिक अंतर राखण्याविषयी आवाहन केले.

सौंदत्ती (जिल्हा बेळगाव) येथील रेणुका मंदिर भाविकांसाठी बंद !

सौंदत्ती (जिल्हा बेळगाव) येथील रेणुका मंदिर

बेळगाव – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सौंदत्ती येथील रेणुका मंदिर पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी डी.सी. हिरेमठ यांनी हा आदेश काढला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात देवीचे लाखो भक्त असून दळणवळण बंदीच्या अगोदर हे मंदिर ९ मास बंद होते. आता परत एकदा मंदिर बंद करण्यात आल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून १ सहस्र २०० हून अधिक मठ आणि धर्मशाळा यांना नोटीस

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनामुळे येथे माघ यात्रा कालावधीत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. माघ वारीच्या निमित्ताने राज्यभरातून काही दिंड्या येथे येण्यास प्रारंभ झाला असल्याने पोलिसांनी शहरातील १ सहस्र २०० हून अधिक मठ आणि धर्मशाळा यांना नोटीस देण्यास प्रारंभ केला आहे. सध्या मंदिरामध्ये येणार्‍या भाविकांची संख्या अधिक प्रमाणात वाढल्याने प्रत्येकी २ घंट्यांनी श्री विठ्ठल मंदिराचे ‘सॅनिटायझेशन’ करण्यास प्रारंभ केला आहे.