‘मोबाईल अ‍ॅप’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ पोलीस तक्रार कशी करावी ?

सर्वसामान्य व्यक्तीसाठी पोलीस ठाण्यात तक्रार करणे, ही गुंतागुंतीची गोष्ट असते, तसेच ती नोंदवण्यासाठी बराच वेळही द्यावा लागतो. आता मात्र प्रत्यक्ष पोलीस ठाण्यामध्ये न जाता ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट करता येते. महाराष्ट्र पोलीसदलाच्या वतीने तक्रार नोंदवण्यासाठी ‘महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल’ हे भ्रमणभाष ‘अ‍ॅप’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती कुठूनही ‘ऑनलाईन’ पोलीस तक्रार नोंदवू शकते. हे ‘अ‍ॅप मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये असून अ‍ॅन्ड्रॉईड भ्रमणभाषधारक ते ‘गूगल प्ले स्टोअर’वरून ‘डाऊनलोड’ करून घेऊ शकतात.

‘ऑनलाईन’ ‘ई-तक्रार’ नोंदवण्याची पद्धत

१. ‘मोबाईल अ‍ॅप’ मध्ये नोंदणी केल्यानंतर नागरिक पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्त कार्यालय यांना ‘ऑनलाईन’ ई-तक्रार देऊ शकतात.

२. तक्रार प्रविष्ट झाल्याविषयी तक्रारदाराला ‘एस्.एम्.एस्.’ आणि ‘ई-मेल’ द्वारे पोच प्राप्त होते.

३. तक्रारीचा क्रमांक आणि तक्रार कोणत्या पोलीस ठाण्याला अथवा वरिष्ठ कार्यालयाला दिली आहे, याची माहिती देण्यात येते.

४. प्राप्त तक्रारीचे ठाणे प्रभारी अवलोकन करतात आणि त्या तक्रारीमध्ये दखलपात्र गुन्ह्याचे स्वरूप आढळून आल्यास संबंधित अधिकारी हे तक्रारदाराला ‘एस्.एम्.एस्.’ आणि ‘ई-मेल’ पाठवतात, तसेच पोलीस ठाण्यामध्ये येऊन स्वाक्षरीसह तक्रार प्रविष्ट करण्याची विनंती करतात.

५. तक्रारीमध्ये अदखलपात्र गुन्ह्याचा प्रकार आढळून आल्यास त्या तक्रारीच्या चौकशीसाठी अन्वेषण अधिकारी नेमण्यात येतो आणि त्याची माहिती तक्रारदाराला ‘एस्.एम्.एस्.’ आणि ‘ई-मेल’ द्वारे कळवण्यात येते.

६. तक्रारीचे निवारण करण्यात आल्यानंतर तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली, याविषयीची माहिती तक्रारदाराला ‘एस्.एम्.एस्.’ आणि ‘ई-मेल’ द्वारे प्राप्त होते.

७. दिलेल्या तक्रारीची सद्य:स्थिती पहाण्याची सुविधाही या ‘अ‍ॅप’मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलीसदलाच्या वतीने करण्यात येत आहे. तक्रार नोंद करणे, तक्रारीची सद्य:स्थिती पहाणे, गहाळ भ्रमणभाषसंचाची सूचना देणे, हरवलेल्या व्यक्तीची तक्रार करणे, अनोळखी मृतदेहाची माहिती देणे, हरवलेल्या वाहनाची तक्रार देणे, चोरीची तक्रार करणे, प्रतिक्रिया नोंदवणे आदी गोष्टींसाठी या ‘अ‍ॅप’चा लाभ करून घेता येईल.