सरकारकडून वेतन मिळूनही कायद्याला धरून नव्हे, तर लाच घेऊन गुन्हेगारांना साहाय्यभूत होईल, असे अन्वेषण करणारे भ्रष्ट पोलीस !

सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक

​‘फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १५४ नुसार पोलिसांकडून दखलपात्र गुन्हा नोंदवल्यानंतर त्या गुन्ह्याचे अन्वेषण केले जाते. त्यानंतर आरोपीविषयी न्यायालयामध्ये आरोपपत्र ठेवले जाते आणि खटला चालू होतो. सर्वप्रथम आरोपीच्या विरोेधात न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट करतात. त्यानंतर प्रकरणातील तक्रारदार, साक्षीदार आणि पंच यांना साक्षीसाठी उपस्थित रहाण्यासाठी समन्स काढले जातात. समन्स काढूनही साक्षीदार, पंच किंवा जामिनावर असलेला आरोपी उपस्थित झाला नाही, तर ‘वॉरंट’ काढले जाते. पोलीस ठाण्यामध्ये ‘समन्स’ आणि ‘वॉरंट’ बजावण्यासाठी २ ते ३ पोलीस अंमलदारांची नेमणूक केलेली असते. समन्स काढणे आणि ‘वॉरंट’ बजावणे या प्रक्रियांत होणारी कर्तव्यचुकारता, लाचखोरी आणि भ्रष्टाचार यांविषयी आजच्या भागात पाहूया.

१. आरोपीकडून लाच घेऊन त्याला समन्स न देता आरोपी मिळत नसल्याचा खोटा अहवाल न्यायालयात सादर करणे, तसेच अटकेची भीती दाखवून आरोपीकडून पैसे उकळणे

अनेक वेळा पोलिसांकडून आरोपींना सर्वच समन्स काळजीपूर्वक दिले जात नाहीत. काही प्रकरणांमध्ये आरोपीचा पत्ता पालटल्यामुळे त्याचे निवासस्थान मिळत नाही. काही प्रकरणांमध्ये आरोपीने पोलिसांना लाच दिली असेल, तर पोलीस न्यायालयाला ‘आरोपी मिळत नाही’, असा खोटा अहवाल देतात. जेव्हा न्यायालय पोलिसांना ‘वॉरंट’ बजावण्यासाठी पाठवतात, तेव्हा काही पोलीस आरोपी, साक्षीदार यांना अटकेची भीती दाखवून पैसे उकळतात किंवा तडजोडी करतात.

२. आग लागणे, रस्ते अपघात आदी प्रसंगी लाच घेऊन संबंधिताला अपेक्षित असा पंचनामा करून देणे

कायदा आणि सुव्यवस्था राखणे, तसेच खासगी अन् सार्वजनिक संपत्ती यांचे रक्षण करणे, हे पोलिसांचे कर्तव्य आहे. समाजात काही घटना अचानक घडतात, तर काही घडवल्या जातात. एखाद्या व्यावसायिक प्रतिष्ठानाला किंवा गोडाऊनला आग लागली, तर पोलीस पंचनामा करतात. काही वेळा आगीमध्ये झालेली हानी भरून येण्यासाठी व्यावसायिक विम्याचा हवा तसा दावा प्रविष्ट करण्यासाठी पोलिसांना लाच देतात. तसेच मोटार अपघातामध्ये वाहनाची हानी झालेली असते, तेव्हा मोटारमालक विम्याचा दावा प्रविष्ट करण्यासाठी पोलिसांना लाच देऊन पंचनामा करून घेतात.

३. संशयितांची अटक टाळण्यासाठी किंवा गुन्ह्यातील सहभाग अल्प दाखवण्यासाठी लाच स्वीकारणारे पोलीस

पोलीस अधिकारी काहींना संशयित म्हणून पोलीस ठाण्यामध्ये पुष्कळ वेळ बसवून ठेवतात. काही जणांना पोलीस जाणीवपूर्वक विलंबाने अटक करतात. काही पोलीस अधिकारी संशयितांकडून तात्पुरती अटक टाळण्यासाठी लाच स्वीकारतात. गुन्ह्यातील सहभाग अल्प दाखवण्यासाठी, तसेच गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी पोलीस अधिकारी आरोपीशी तडजोडी करतात. अटकपूर्व जामीन मिळवायचा असल्याने पोलीस अधिकार्‍यांना लाच देऊन अटक टाळली जाते. एखाद्या गुन्ह्यामध्ये व्यक्तीला संशयित म्हणून तात्काळ अटक केली जाते; परंतु न्यायालयामध्ये दोषारोपपत्र ठेवण्याएवढाही पुरावा न मिळाल्याने फौ.दं.प्र.स.कलम १६९ अन्वये त्याला सोडून दिले जाते. (पोलीस अधिकार्‍याने कोणत्याही अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयापुढे आणण्यास जाणीवपूर्वक विलंब केला, तर मुंबई पोलीस कायदा १९५१ कलम १४८ प्रमाणे गुन्हा ठरतो.)

४. ताठ मानेने आयुष्य जगण्यासाठी पोलिसांनी भ्रष्ट मार्गाचा त्याग करावा !

जो मनुष्य लाच देतो, तो स्वत:चे पैसे गमावून त्याच्या बदल्यात स्वत:चा वेळ आणि कष्ट वाचवत असतो अन् त्याचा उपयोग तो दुसरीकडे करतो. याउलट जो सरकारी नोकर लाच घेऊन पैसे कमावतो, तो त्या पैशांच्या बदल्यात त्याची नीतीमत्ता आणि चारित्र्य गमावून बसतो. लाच देणारा हा आयुष्यभर लाच घेणार्‍याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी मोकळा असतो; म्हणून ज्याला स्वतःचे चारित्र्य आणि नावलौकिक टिकवून ठेवायचा असेल, त्याने भ्रष्ट मार्गाकडे वळता कामा नये. एकदा हा कलंक लागला की, तुम्हाला आयुष्यभर कधीही ताठ मानेने जगता येणार नाही. अशांना संपूर्ण आयुष्यभर मानहानीचे जीवन जगावे लागते, हे लक्षात घेतले पाहिजे.’

– एक निवृत्त पोलीस अधिकारी (जानेवारी २०२१)

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !

​पोलीस-प्रशासन यांतील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याविषयी कटू अनुभव आले असल्यास ते पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. या लेखाचे प्रयोजन ‘पोलीस आणि प्रशासन कसे नसावे’ हे ध्यानात यावे, संबंधित कर्मचारी/अधिकारी यांना त्यांच्या अयोग्य कृत्यांची जाणीव होऊन त्यांनी त्यात सुधारणा करावी आणि नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते सुधारण्यास प्रयत्न करावेत, वेळप्रसंगी या विरोधात तक्रारी द्याव्यात, हे आहे.

पत्ता :
अधिवक्ता नीलेश सांगोलकर
द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.
संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४
ई-मेल : [email protected]