देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या श्रीमती कमलिनी कुंडले यांच्या मावसभावाची मुलगी (भाची) मिरज येथील चि.सौ.कां. श्वेता (भक्ती) भानुदास कुंडले आणि वारणानगर, कोल्हापूर येथील श्री. बळीराम बिराजदार यांचे सुपुत्र चि. अमोल बिराजदार हे उभयता माघ शुक्ल पक्ष दशमी (२२.२.२०२१) या दिवशी विवाहबद्ध होत आहेत. त्या निमित्ताने जानराववाडी, मिरज (जि. सांगली) येथे रहाणार्या चि.सौ.कां. श्वेताच्या कुटुंबियांनी सांगितलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. अमोल बिराजदार आणि चि.सौ.कां. श्वेता (भक्ती) कुंडले यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. श्री. रामदास आणि सौ. विद्या कुंडले (चि.सौ.कां. श्वेताचे मोठे काका-काकू)
१ अ. शांत आणि समजूतदार : आमची पुतणी भक्ती (श्वेता) लहानपणापासूनच शांत, मनमिळाऊ, संयमी, सोशिक आणि समजूतदार आहे. तिला मैत्रिणी थोड्याच आहेत; पण ज्या आहेत, त्या तिच्यासारख्याच जिद्दी आहेत.
१ आ. नाती जपणे : मोठ्यांचा आदर कसा करावा ?, हे तिला सांगण्याची कधी आवश्यकताच भासली नाही. नात्यांमधील गोडवा जपणे, सर्वांचा आदर राखणे इत्यादी गुणांमुळे ती सर्वांचीच लाडकी आहे.
१ इ. कष्टाळू स्वभाव आणि दृढता यांमुळे घराण्याचे अन् गावाचे नाव उज्ज्वल करणे : श्वेताची ध्येयाविषयीची दृढता आणि कष्टाळू स्वभाव यांमुळेच तिने यशाचे शिखर गाठून घराण्याचे अन् गावाचेही नाव उज्ज्वल केले. आतापर्यंत तिला मिळालेल्या यशात आमच्या कुटुंबातील प्रत्येकाचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तर आहेतच; पण सर्वांत महत्त्वाचे तिचे प्रयत्न आणि दृढता हेही आहे.
२. श्री. शंकर आणि सौ. कमल कुंडले (चि.सौ.कां. श्वेताचे मधले काका-काकू)
२ अ. सर्वांशी मिळून मिसळून रहाणे :
कु. भक्तीचा स्वभाव गोड आणि सुशील आहे. एकुलती एक असूनही ती तिच्या आई-बाबांना मुलाची उणीव जाणवू देत नाही. सर्वांशी हसत-खेळत आणि मिळून मिसळून रहाते. उत्तम शिक्षण घेऊन तिने आई-बाबांची इच्छा पूर्ण केली आहे.
३. श्री. भानुदास कुंडले (चि.सौ.कां. श्वेताचे वडील)
३ अ. समाजऋणाची जाणीव असल्याने खासगी नोकरी न करता प्रशासकीय अधिकारी होणे : खासगी क्षेत्रात नोकरीची संधी असूनसुद्धा आपण समाजाचे ऋणी आहोत आणि हे ऋण आपण फेडले पाहिजे, या जाणीवेतून भक्तीने स्पर्धा परीक्षांची सिद्धता केली. तिच्यातील दृढता आणि चिकाटी या अंगभूत गुणांमुळे ती सध्या कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे.
४. डॉ. भरत आणि सौ. स्मिता कुंडले (चि.सौ.कां. श्वेताचे धाकटे काका-काकू)
४ अ. लहानपणापासून श्वेता स्वभावाने मृदू, प्रेमळ आणि पुष्कळ हळवी असून तिची देवावर दृढ श्रद्धा आहे.
४ आ. इतरांचा विचार करणे : श्वेता या नावाप्रमाणेच ती शुद्ध, सात्त्विक, पवित्र आणि निर्मळ मनाची आहे. स्वतःचे सुख आणि सोयी यांपेक्षा इतरांच्या सुखसोयींचा अधिक विचार करण्याचा तिचा स्वभाव आहे.
४ इ. श्वेता अतिशय सकारात्मक विचारांची आणि कष्टाळू आहे. ध्येय साध्य करण्यासाठी ती जिवाचे रान करते.
४ ई. आदर्श विद्यार्थिनी : शाळेत असतांना ती अभ्यासासह इतर शालेय उपक्रमांमध्येही अगदी उत्साहाने सहभागी होत असे. खेळांच्या स्पर्धा असोत, वक्तृत्व स्पर्धा असोत, स्नेहसंमेलनात नृत्य करणे असो किंवा नाटकात काम करणे असो, अशा सर्वच गोष्टींमध्ये ती मनापासून सहभागी होत असे. तिच्या या वैशिष्ट्यांमुळेच तिला शाळेत आदर्श विद्यार्थिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
बुद्धीमान, आज्ञाधारक आणि उत्तम शैक्षणिक कारकीर्द घडवणारी मिरज येथील कु. श्वेता भानुदास कुंडले !श्वेता लहानपणापासूनच पुष्कळ बुद्धीमान आणि आज्ञाधारक आहे. तिचे शैक्षणिक जीवन उत्तम आहे. ती शाळेतील सर्व शिक्षकांची आवडती आहे. तिला इयत्ता ४ थी आणि ७ वी मध्ये शालेय शिष्यवृत्ती मिळाली होती. तिला दहावीत ९४.३ टक्के आणि बारावीत ८९.५ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर तिला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे या नावाजलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिने तेथील शिक्षणही उत्तम प्रकारे पूर्ण केले. त्यानंतर एम.पी.एस्.सी आणि यू.पी.एस्.सी. यांच्या वतीने घेण्यात येणार्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी तिने त्या शाखेतील पुढील शिक्षण घेतले नाही. ४ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर तिला महाराष्ट्र शासनाच्या कर आणि प्रशासकीय अधिकारी या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. सध्या ती तासगाव येथील नगरपरिषदेत कार्यालय अधीक्षक या पदावर कार्यरत आहे. ती अत्यंत उत्तम प्रकारे स्वतःची सर्व कामे आणि उत्तरदायित्व पार पाडत आहे. ती तळागाळातील लोकांच्या अडचणी सोडवण्याचे काम उत्तम प्रकारे करत आहे. तिच्या कामात ती सध्या समाधानी आहे. – सौ. सुनीता भानुदास कुंडले (आई), मिरज (ऑक्टोबर २०२०) |